तळोजा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

By admin | Published: May 23, 2014 03:09 AM2014-05-23T03:09:13+5:302014-05-23T03:09:13+5:30

तळोजा रेल्वे स्टेशनमध्ये रात्रभर तिकीट रांगेत ताटकळत बसलेल्या प्रवाशांना काही दलालांच्या घुसखोरीमुळे तिकीट मिळत नाही.

Disadvantages of Passengers at Taloja Railway Station | तळोजा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

तळोजा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

Next

नवी मुंबई : तळोजा रेल्वे स्टेशनमध्ये रात्रभर तिकीट रांगेत ताटकळत बसलेल्या प्रवाशांना काही दलालांच्या घुसखोरीमुळे तिकीट मिळत नाही. याठिकाणी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांनाही तिकिटाचे आरक्षण करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या तळोजा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर केंद्र सरकारने रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सुरू केला आहे. याठिकाणी जवळपास १५०० जवान कार्यरत आहेत. जवानांच्या सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाने या स्थानकावर तिकीट आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कळंबोली, खारघर आणि तळोजा येथील प्रवासी तिकीट मिळविण्यासाठी जवळ असलेल्या तळोजा स्थानकावर येतात. आरक्षणाची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन अशी आहे, तर तत्काळचे तिकीट सकाळी दहाच्या नंतर सुरु होते. तत्काळ तिकीट मिळावे यासाठी काही प्रवासी तिकीट मिळविण्यासाठी खिडकीजवळ रात्रभर तळ ठोकून असतात. मात्र काही दलाल मंडळी दादागिरी करून आपला क्रमांक असल्याचे सांगून तिकीट मिळवून निघून जातात. रात्रभर रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. अशीच अवस्था रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांची आहे. तिकिटासाठी उभे राहिल्यास कामाचा खाडा होतो. शासनाने जवानांच्या हितासाठी तिकीट खिडकी सुरु केली, परंतु काही लाभ होत नाही. रेल्वे पोलीस असूनही उपयोग नाही अशी संतप्त प्रतिक्रिया येथे येणारे प्रवासी देत असतात. तिकीट आरक्षणाच्या माहितीसाठी रेल्वे आणि गाडी क्र मांक दर्शविणारे फलक दर्शनी भागात नाही. त्यासाठी रांग सोडून प्रवाशांना स्थानकात जावे लागते. स्थानकात साफसफाई नियमित होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नो पार्किंगमध्ये दलाल दुचाकी वाहने बिनधास्त उभी करतात, तरीही रेल्वे प्रशासन काहीही करीत नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार काही रेल्वे कर्मचारी दलाल मंडळींना मदत करीत असल्याचे समजते. तळोजा रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सी. बी. मीना यांच्याशी संपर्क साधला असता, ते रजेवर असल्याचे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Disadvantages of Passengers at Taloja Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.