मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले आहे ते धक्कादायक आणि धोकादायक आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये. त्यामुळे वंचितला सन्मानजनक जागा मिळाल्या तर त्यांनी महाआघाडीत सहभागी व्हावे, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे गुरुजी, पक्षाचे प्रवक्ते चरणदास इंगोले, मुंबई अध्यक्ष मिलिंद सुर्वे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना कवाडे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाआघाडीसोबत राहील. पक्ष विधानसभेच्या ५१ जागा लढविणार असून काही जागांची यादी महाआघाडीतील मित्रपक्षांना दिली आहे, असेही ते म्हणाले.