मुंबई : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसने पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याचे जाहीर केले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र पोटनिवडणूक लढविण्यावरून लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, बापट यांच्या निधनाला केवळ तीनच दिवस झाले आहेत असे काँग्रेसला नाव न घेता सुनावले आहे.
निवडणूक आयोगाने पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुणे लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहोत, असे वडेट्टीवार यांनी जाहीर केले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीवरून काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत. माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही? महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधाने केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही; पण मनाची लाज वाटते की नाही असे लोक म्हणतील, असे पवार म्हणाले.
१५ महिने शिल्लक
गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार लोकसभा अथवा विधासभेची मुदत संपण्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यास जागा रिक्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. विद्यमान सतराव्या लोकसभेची मुदत १६ जून २०२४ रोजी संपत आहे. लोकसभेचा कालावधी संपण्यास अजून १५ महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने निवडणूक अयोगाकडून पोटनिवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.