Join us

विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत मतभेद; तीनही पक्षांनी दावा केल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

By दीपक भातुसे | Published: July 11, 2024 9:38 AM

महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. 

मुंबई : मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी या अधिवेशनात निवडणूक होईल अशी शक्यता होती, मात्र महायुतीतील तीन पक्षांतील मतभेदांमुळे या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला चालू पावसाळी अधिवेशनातच सभापतीपदाची निवडणूक घ्यायची होती. निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांना देण्यासाठी विनंतीपत्र ही मागील आठवड्यात तयार करण्यात आले होते. मात्र शिंदे सेना आणि अजित पवार गटाने या पदावर दावा सांगितल्याने राज्यपालांकडे ते विनंतीपत्र अद्याप पाठवण्यात आलेले नाही. 

शताब्दी, पण सभापतीच नाहीत 

विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी विधानभवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती या कार्यक्रमाला येणार आहेत, पण अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाला पद रिक्त असल्याने सभापती असणार नाहीत.

संख्याबळानुसार भाजप दावेदार

विधानपरिषदेत महायुतीत भाजपचे सर्वाधिक १९ आमदार आहेत, तर अजित पवार गटाकडे ६ आणि शिंदेसेनेकडे ३ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजपने सभापती पदावर दावा सांगितला. दुसरीकडे विद्यमान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करताना त्यांना सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता. 

शिंदे सेनेकडून याची आठवण करून देत सभापती पदावर दावा सांगण्यात आला. तर माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करताना त्यांनाही सभापती पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे अजित पवार गटही आग्रही आहे.

चालू अधिवेशनात सभापतीपदाची निवडणूक झाली तर महायुतीला सभापतीपद मिळू शकते. अन्यथा विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाल्यास या पदावर महायुतीला पाणी सोडावे लागेल. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवडणुकीची मागणी केली आहे.   

टॅग्स :विधानसभामहायुतीएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार