Join us

विमान इंधनाने पुन्हा केली निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विमान इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, सप्टेंबरच्या सुरुवातीला काहीसा दिलासा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विमान इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, सप्टेंबरच्या सुरुवातीला काहीसा दिलासा मिळाला. ऑगस्टच्या तुलनेत एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (एटिफ) दर १ सप्टेंबरला २ हजार ६२३ रुपयांनी कमी झाले. मात्र, १६ सप्टेंबरला त्यात पुन्हा २ हजार ८१ रुपयांची वाढ झाल्याने विमान कंपन्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

ऑक्टोबर २०२० पासून विमान इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यात कोरोनामुळे प्रवासी क्षमता आणि विमान फेऱ्यांवर लागू केलेल्या मर्यादा, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे प्रवासीसंख्या ६५ टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्र तोट्यात आहे. विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने अलीकडेच विमान तिकिटांवरील किमान मर्यादा वाढविली. त्यात इंधन वाढीचा आलेख चढता असल्याने तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.

ऑगस्ट महिन्यात विमान इंधनाचे दर ६७ हजार ३८५ रुपये किलोलिटर इतके होते. १ सप्टेंबरला ते ६४ हजार ७६२ पर्यंत खाली आले. त्यामुळे विमान कंपन्यांसमोर आशेचा किरण जागृत झाला. मात्र, १६ सप्टेंबरला एटीएफचे दर ६६ हजार ८४३ रुपयांवर पोहोचल्याने त्यांची निराशा झाली. चालू वर्षाचा विचार विमान इंधनात ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ४९ हजार ८४ इतके नोंदविण्यात आले होते.

एखाद्या मार्गावर विमानफेरी चालवायची झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात विमान इंधनाचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक असतो. इतर खर्चात कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल, विमानतळावरील शुल्काचा समावेश होतो. परिणामी विमान इंधन महागले की फेरीमागील खर्चात आपोआप वाढ होते. हा अतिरिक्त भार तिकिटांच्या दरात वाढ करून प्रवाशांकडून वसूल केला जातो.

.............

परदेशातून इंधन आणणेही अशक्य

भारतात विमान इंधनाचे दर वाढले की विमान कंपन्या परदेशातून एटीएफ आणण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे तिकीट दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. परंतु, कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आल्याने हा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे वाढीव खर्च प्रवाशांच्या माथ्यावर मारण्याखेरीज विमान कंपन्यांसमोर अन्य पर्याय राहिलेला नाही

...........

मुंबईतील विमान इंधनाचे दर

महिना...... किंमत (रुपयात)

जानेवारी..... ४९,०८४

फेब्रुवारी........ ५१,९००

मार्च......... ५७,५१९

एप्रिल........ ५६,४७९

मे........ ५९,८२२

जून.......... ६२,२७९

जुलै....... ६८,०६४

ऑगस्ट.... ६७,३८५

१ सप्टेंबर .... ६४,७६२

१६ सप्टेंबर ....६६,८४३.६५