सरकारकडून विकासकांचा अपेक्षाभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:09 PM2020-06-09T19:09:00+5:302020-06-09T19:09:21+5:30
मुंबई महानगरांतील विकासकांचा आरोप; केंद्राकडे शिफारस करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना साकडे
मुंबई : आमचा व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला असून त्याला संजीवनी देण्यासाठी अनेक ठिकाणी गा-हाणी मांडली. सरकारलाही आमच्या अडचणी कळल्या आहेत. पण, कुठूनही सकारात्मक आणि ठोस प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काही विकासक तर आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत अशा शब्दात मुंबई महानगर क्षेत्रातील विकासकांच्या संघटनांनी सरकारकडून होत असलेल्या अपेक्षाभंगाची खदखद व्यक्त केली. आता तुम्हीच आमचे पालनहार आहात, तुम्हीच केंद्र सरकारकडून मदत मिळवून द्या अशी विनंती या संघटनांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोरोना संकटामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्या व्यावसायिकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली एका अँक्शन कमिटी स्थापन केली आहे. या अँक्शन कमिटीने आपल्या मागण्यांसाठी आँनलाईन याचिकेची मोहिमही राबवली आहे. याचिकेत केलेल्या मागण्या पंतप्रधान, अर्थमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांपुढे मांडून त्या मंजूर करून द्या असे साकडे या कमिटीने वेबिनारच्या माध्यमातून फडणवीस यांना घातले आहे. क्रेडाई आणि एमसीएचआयच्या पुढाकाराने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारने विविध उद्योगांना संजीवनी देण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांचे पँकेज जाहीर केले असले तरी त्यातून बांधकाम व्यवसायाला कोणताही फायदा होताना दिसत नाही. बँका स्वतःचा फायदा बघत असून कर्ज पुरवठा करत नाहीत. घर खरेदीला चालना मिळेल असे वातावरण तयार होत नाही. बांधकाम मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे विकासक चोहोबाजूंनी अडचणीत सापडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विकसकांची या अभूतपूर्व कोंडीची मला कल्पना आहे. त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी प्राथमिक बोलणीसुध्दा झाली आहेत. केंद्र सरकारकडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करतोय असे फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, राज्य सरकारकडूनही विकासकांना विविध सवलती मिळायला हव्यात असे मतही त्यांनी व्यक्त केले.
छोट्या विकासकांना संपवण्याचा प्रयत्न ?
मुंबईतील बहुसंख्य विकासक हे मध्यम आणि छोट्या स्वरुपाचे आहेत. सरकारच्या धोरणांमुळे त्यांच्या अडचणी दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यांनी आपला व्यवसाय बंद करावा आणि केवळ बड्या बांधकाम व्यवसायिकांनाच कामकाज करता यावे अशी तर सरकारची भूमिका आहे का, असा सवाल या वेबिनारमध्ये उपस्थित करण्यात आला होता. मात्र, देशाचे पंतप्रधान हे कामय छोट्या व्यावसायिकांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहतात. तुम्ही चिंता करू नका अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली.