Join us  

अजित पवार गटाच्या प्रवेशाने शिंदे गटातील इच्छुकांची निराशा

By दीपक भातुसे | Published: July 22, 2023 10:07 AM

सहनही होईना अन् सांगताही येईना; अनेकांनी सोडली मंत्रिपदाची आशा

दीपक भातुसे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आपले मंत्रिपद हुकल्याची भावना शिंदे गटातील आमदारांची झाली आहे. मात्र, याप्रकरणी सहनही होईना आणि सांगताही येईना, अशी अवस्था या मंत्र्यांची आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. यात शिंदेसह दहा जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली. 

बंड करताना यातील अनेक आमदारांना शिंदे यांच्याकडून तसेच भाजपकडून मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण न झाल्याने त्यांच्यातील नाराजी डोके वर काढत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिंदेंबरोबरच्या ज्येष्ठ नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, यातील अनेकजण महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते. पहिला विस्तार झाला तेव्हा लवकरच दुसरा विस्तार करून इतरांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, असे सांगितले गेले. मात्र, वर्षभर विस्तार रखडला. विस्ताराची चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचा प्रवेश झाला. फुटलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ जणांना मंत्रिपदे मिळाली. दुसऱ्या विस्तारानंतरही पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरूच होती. मंत्रिमंडळ विस्तार या विषयावर शिंदे गटातील आमदार उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. आता हा विषयच नको, आपल्याला यावर बोलायचेच नाही, असे सांगत शिंदे गटातील आमदार कानावर हात ठेवत आहेत.

शिंदे गटाबरोबर गेलेल्या विदर्भातील एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मी आता मंत्रिपदाची आशा सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमचे मंत्रिपद हुकले. आता यावर बोलणे मी सोडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हे आमदार विस्ताराबाबत उघडपणे वक्तव्य करत होते. दुसरीकडे शिंदे गटातील जे आमदार आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उघडपणे बोलत होते, ते भरत गोगावले आणि संजय शिरसाट हेही याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.

काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात

     शिंदे गटातील ही अस्वस्थता बघता यातील काही आमदारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क सुरू केल्याचे बोलले जात आहे.      याबाबत शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता, आता त्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, आमदारांना सध्या विकासनिधी महत्त्वाचा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत कुणी येणार नाही. तेव्हा काय होते ते पाहा, असे परब म्हणाले.

शिंदे गटातील मंत्र्यांनाही फटकाएकीकडे शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज आहेत. दुसरीकडे अजित पवार गटातील मंत्र्यांसाठी शिंदे गटातील काही मंत्र्यांना आपल्याकडील खात्यांचा त्याग करावा लागला. अब्दुल सत्तार यांना कृषी खाते सोडावे लागले, तर संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन विभाग सोडावा लागला. तसेच, शिंदे गटाकडे असलेले मदत व पुनर्वसन आणि बंदरे ही खातीही अजित पवार गटाला देण्यात आली.

विस्ताराची केवळ प्रतीक्षाच

शिंदे गटातील भरत गोगावले, संजय शिरसाट मंत्रिमंडळ विस्तार होणार, आपल्याला संधी मिळणार, असे जाहीरपणे बोलत होते. मात्र, अधिवेशन सुरू झाले तरी, विस्तार न झाल्याने आता शिंदे गटातील आमदारांनी विस्ताराची आशाच सोडली आहे.

टॅग्स :अजित पवारएकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना