डोंबिवली : मालगाडी धावत असतानाच रुळांमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याची शंका गार्ड एच.बी. पाटील यांना आली. मात्र, तरीही सावधपणे गाडी पुढे गेल्यानंतर त्यांनी लाल सिग्नल देऊन गाडी थांबवली. त्यानंतर, रुळांची पाहणी केली असता रूळ तुटला असल्याचे निदर्शनास आले. ही घटना सोमवारी सकाळी ८.०५च्या सुमारास दिवा-वसई मार्गावरील डोंबिवली सेंट्रल केबिननजीक घडली. गार्डने प्रसंगावधान राखून तातडीने लाल सिग्नल दाखवून केबिनमधील कर्मचाऱ्यांना सावध केले. त्यानुसार, त्यांनीही सतर्कता दाखवून धावपळ केली आणि मागून येणाऱ्या दुसऱ्या लांब पल्ल्याच्या गाडीला कसेबसे थांबवले. गार्ड पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होता होता टळला. त्यानंतर, तातडीने या ठिकाणचे काम हाती घेण्यात आले. दुपारनंतर काम झाल्यावर वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती गार्ड गोरख पाटील यांनी दिली. गार्डच्या सतर्कतेबद्दल त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, अशी मागणी गोरख यांच्यासह अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली.
गार्डच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
By admin | Published: September 15, 2015 2:09 AM