कोरोनाला रोखणार डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:07 PM2020-04-09T15:07:39+5:302020-04-09T15:08:11+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी गिर्यारोहकांनीदेखील खारीचा वाटा उचलला आहे.

Disaster Management Task Force Stopping Corona | कोरोनाला रोखणार डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स

कोरोनाला रोखणार डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स

googlenewsNext

 

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार, खासगी संस्था, सार्वजनिक मंडळे आणि मुंबईकर  आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही केल्याने कोरोनाला संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिणामी आता कोरोनाला रोखण्यासाठी गिर्यारोहकांनीदेखील खारीचा वाटा उचलला आहे. गिर्यारोहक आता आपल्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत असून, यास नागरिकांनी अधिकाधिक  हातभार लावावा, असे आवाहन गिर्यारोहकांनी केले आहे.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे सचिव राजन बागवे यांच्याकडील माहितीनुसार, कोरोनाच्या प्रसारामुळे देशभर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रातील करोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक प्रकारे तयारी केली जात आहे. यासाठी मोठया प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनसीसी, एनएसएस, क्रीडा संस्था, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून तरुणांची एक मोठी फळी तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक व इतर शहरातील अनेक गिरिमित्र आणि दुर्गमित्र यांनी अशा मदत कार्यात भाग घेऊन खारीचा वाटा उचलला आहे. पुण्यात गिरिप्रेमी संस्थेच्या वतीने मदतकार्य सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजच्या संकटासोबतच भविष्यातील गरजेचा विचार करता हे कार्य संघटीत स्वरूपात व राज्यातील सर्व भागात करता यावे म्हणून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. याबाबतचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी करण्यात आला असून महासंघ सेवासज्ज आहे, असे कळविण्यात आले आहे. महासंघाच्या जिल्हा पातळीवरील कार्यकारिणी व समिती या आपत्कालीन काळामध्ये सर्वोत्तपरी मदत करण्यास तयार आहेत. महासंघाच्या या डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्सच्या माध्यमातून महासंघाने जिल्हापातळीवर अतिशय प्रशिक्षित व अनुभवी स्वयंसेवकांची फळी सुसज्ज करण्याचे काम हाती घेतले आहे.

या कार्यात ज्यांना सहभागी व्हायचे आहे; त्यांनी महासंघाकडे आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आजच्या कठीण काळात मानवसेवा व देशसेवा करण्यासाठी आपण सर्वांनी उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यामुळे समाजसेवेची जाण व इच्छा असणा-या राज्यातील सर्वजणांना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. आपत्कालीन वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असते. त्याचाच एक प्रयत्न अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ करीत आहे. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन संघाने केले आहे.

Web Title: Disaster Management Task Force Stopping Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.