सात हजार मुंबईकरांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:56 AM2018-08-25T02:56:31+5:302018-08-25T02:58:24+5:30
परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीमध्ये लागलेल्या आगीत दहा वर्षांच्या मुलीने समयसूचकता दाखवून १७ रहिवाशांचे प्राण वाचविले.
मुंबई : परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीमध्ये लागलेल्या आगीत दहा वर्षांच्या मुलीने समयसूचकता दाखवून १७ रहिवाशांचे प्राण वाचविले. शाळेत मिळालेल्या आपत्कालीन प्रशिक्षणाने तिला हुशारी व बळ दिले. हेच प्रशिक्षण आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने आतापर्यंत सहा हजार ७८४ रहिवाशांना दिले आहे.
विविध आपत्तींचा मुकाबला प्रभावीपणे करता यावा, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रशिक्षणाची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थेटपणे प्रशिक्षण दिले जाते. तर काही वेळा हे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाऊन नंतर हे प्रशिक्षणप्राप्त शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे महापालिका शाळांमधील शिक्षकांसह केंद्रीय विद्यालय, डॉन बॉस्को इंटरनॅशनल, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, के.सी. कॉलेज, खालसा महाविद्यालय, सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, लॉडर््स युनिव्हर्सल कॉलेज, रतनचंद्राजी इंग्लिश मिडियम स्कूल, वालीया कॉलेज, गाला कॉलेज, सोफिया कॉलेज, आॅक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल, अंजुमन इस्लाम कॉलेज, लाला लजपतराय कॉलेज, रुईया कॉलेज, विल्सन कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, गुरुकुल कॉलेज, गांधी बाल मंदिर, जे.एम. पटेल कॉलेज, हिंदुजा कॉलेज, मायकेल हायस्कूल यासारख्या अनेक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आपत्तीकाळात काय करावे?
कोणत्याही आपत्ती प्रसंगी घाबरू नये. शांतपणे व विचारपूर्वक कृती करावी.
धूर दिसत असेल तर चालण्याऐवजी जमिनीवर पालथे व्हा व रांगत-रांगत खाली वाकून पुढे जा.
जर तुम्हाला धूर दिसत असेल तर घरातील स्वच्छ, सुती कापड ओले करा. त्या ओल्या कापडाची घडी करून ते नाका, तोंडावर धरा. ज्यामुळे धूर थेटपणे आपल्या नाकातोंडात जाणार नाही.
अंगावरील कपड्यांना आग लागली असल्यास पळू नये. पळाल्याने आग पसरते. त्याऐवजी जमिनीवर लोळावे, त्याने आग विझते. जमिनीवर लोळताना आपले तोंड/चेहरा हाताने झाकून घ्या.
आग लागलेली असेल तेव्हा इमारतीमधील उद्वाहनाचा म्हणजेच लिफ्टचा वापर अजिबात करू नये.
आपल्या इमारतीमध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा उपकरणे बसवा व त्यांची अधिकृत तज्ज्ञांमार्फत नियमितपणे देखभाल दुरुस्ती करा.
शाळा, महाविद्यालयांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणांव्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय कार्यालये, पोलीस, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था इत्यादींनाही आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात येते.
या अंतर्गत डॉक्टर, परिचारिका, पत्रकार, अभियंता, अधिकारी, कर्मचारी आदींनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच हज यात्रेला जाणाºया यात्रेकरूंच्या ३,१५० प्रशिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण महापालिकेद्वारे देण्यात आले आहे. या प्रशिक्षकांनी देशभरातील त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाऊन तेथील हज यात्रेकरूंना प्रशिक्षण दिले आहे.