पूर नियंत्रणावर आपत्ती व्यवस्थापन ठेवणार लक्ष; पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:27 AM2023-05-03T10:27:51+5:302023-05-03T10:28:15+5:30

पावसाळापूर्व कामांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून मुंबईच्या प्रत्येक प्रभागात ३१ मे पूर्वी त्या त्या हद्दीतील नालेसफाई, रस्त्यांची कामे, तसेच स्वच्छता ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे.

Disaster management will focus on flood control; Preparations for pre-monsoon work are underway | पूर नियंत्रणावर आपत्ती व्यवस्थापन ठेवणार लक्ष; पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू

पूर नियंत्रणावर आपत्ती व्यवस्थापन ठेवणार लक्ष; पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू

googlenewsNext

मुंबई : हल्ली प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होताना दिसते. त्यामुळे बहुतांश मुंबईकरांचे व्यवहार मंदावतात किंवा ठप्प तरी होतात. त्यामुळे पालिकेच्या आपत्ती निवारण विभागापुढे यंदाही पूरमुक्त मुंबई हेच प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. यासाठीच मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारांची स्वच्छता, खडीमुक्त मुंबई यासारख्या कामांसाठी पालिकेने कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. याशिवाय विविध प्राधिकरणांकडून वेळेत वृक्ष छाटणी, पाणी साचणाऱ्या सखोल भागात पंप जोडणी, पोर्टेबल उदंचन संच यावर भर दिला आहे.

इतका काढणार गाळ
पालिकेकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली असून, यंदाच्या पावसाळ्यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामासाठी २२६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या कामांसाठी कंत्राटदारांनी यंत्रसामग्रीची पूर्वतयारी सुरू केली आहे. एकूण ९ लाख ८२ हजार ४२६ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, गाळ काढण्याच्या कामावर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पूर्वी नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पावसाळापूर्व कामांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून मुंबईच्या प्रत्येक प्रभागात ३१ मे पूर्वी त्या त्या हद्दीतील नालेसफाई, रस्त्यांची कामे, तसेच स्वच्छता ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे. शिवाय  जास्त पाऊस झाल्यास कुठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. रस्ते कामांमुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासोबत होर्डिंग व्यवस्थित राहतील याचीही दक्षता घेण्यात येईल. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नागरिकांना स्थलांतरित करणे, त्यांची राहणे, जेवणाची सोय करणे आदी कामांचे नियोजन करून दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत यासाठी लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार नागरिकांना विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिकांसह धडे देण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘आपदा मित्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई पालिका आयुक्त, तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे जानेवारी २०२३ पासून नियमितपणे 
१२ दिवसांचे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन करणे, पूरपरिस्थितीत बचाव व शोधकार्य करणे आदींचा प्रशिक्षणात समावेश आहे.  त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरूपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी, एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेऊन मदतकार्य कसे करावे याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह ओळखपत्र देण्यात येते.

Web Title: Disaster management will focus on flood control; Preparations for pre-monsoon work are underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.