श्वसनाचा त्रास झालेल्या अग्निशमन दलाच्या ११ जवानांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:08 AM2018-12-31T02:08:05+5:302018-12-31T02:08:16+5:30
वरळी येथील साधना हाऊसमध्ये लागलेल्या आगीच्या धुरामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल १६ जवानांना रूग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी पोदार रूग्णालयात दाखल जवानांना रविवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबई : वरळी येथील साधना हाऊसमध्ये लागलेल्या आगीच्या धुरामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल १६ जवानांना रूग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी पोदार रूग्णालयात दाखल जवानांना रविवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, श्वासनाचा त्रास होत असल्याने पाच जवानांवर अद्याप केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वरळी येथील बीडीडी चाळीच्या बाजूला असलेल्या साधना हाऊस या इमारतीच्या तळमजल्यावर शनिवारी सकाळी आगीचा भडका उडाला. या ठिकाणी औषधे व रसायनिक साठा असल्याने ही आग सायंकाळी वाढली. यामुळे मुंबई अग्निशमन दलाने लेव्हल चार म्हणजे सर्वात मोठी आग असल्याचे जाहीर करीत १४ फायर वाहन, आठ जम्बो वॉटर टँकर, एक रेस्क्यू वाहन घटनास्थळी उभी केली.
अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे सकाळी सव्वाचारच्या सुमारास आग पूर्णपणे विझली. मात्र मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुराचा त्रास होऊन १६ जवान व अधिकाºयांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यापैकी चारजणांवर रूग्णवाहिकेतच उपचार करून सोडले, तर प्रत्येकी सहा जवानांना केईएम आणि पोद्दार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
जवानांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह; अग्निशमन दलाची ताकद तोकडी
मुंबईत आग लागण्याची घटना वाढत असतानाच, अग्निशमन दलाचे जवान त्यात जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. मात्र या घटनांनी अग्निशमन दलातील यंत्र सामुग्रीच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वरळी येथील आगीत १६ जवानांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे कृत्रिम श्वसनाचे यंत्रच त्यांच्याकडे नव्हते, असे आता बोलले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेची ही हलगर्जी जवनांचा जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र या आरोपांना फेटाळून लावत त्या ठिकाणी ब्रिथिंग अपेरेटस जवानांबरोबर होते. धूर अधिक असल्याने जवानांना त्रास झाला, असा दावा अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी केला.
पाच जवान अद्याप रूग्णालयात
पोद्दार रूग्णालयात दाखल सहा जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र केईएम रूग्णालयात दाखल विशाल विश्वासराव, स्वाती सातपुते, स्वप्नील चिकने, गौतम महाले, विजय मालसुरे, संजय चव्हाण यापैकी पाच जवानांवर उपचार सुरू आहेत. आयआरसीयूमध्ये आणि इएमएसआयसीयूमध्ये प्रत्येकी दोन आणि वॉर्ड क्र.२२ एमआयसीयूमध्ये एक जवान आहे. या जवानांना शरीरावर भाजलेल्याच्या जखमा अधिक नाहीत. मात्र त्यांना श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ. प्रविण बांगर यांनी दिली.
आगीचे कारण गुलदस्त्यात
साधना हाऊसमध्ये तळजल्यावर औषध व रसायनाच्या साठ्यामध्ये आग लागली होती. आगी मागचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याने स्थानिक परिसर सुरक्षित करण्यास प्राधान्य देण्यात आले. याप्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरच आगीचे मूळ कारण कळेल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले.