मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी, काही दिवसांसाठी रुग्णालयात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर १० नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. आज सकाळी तपासण्या केल्यानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. पर्यटनमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच. एन. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम करणार आहेत.
रुग्णालयातूनच केलं होतं आवाहन
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढणार असून प्रतिबंधाच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. पुन्हा एकदा संसर्गात वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही. त्यामुळे निर्धाराने नियम पाळावे लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, नव्या विषाणूची घातकता लक्षात घेता मुंबईसह सर्व जिल्हा प्रशासनांनी काळजी घ्यावी. विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने रविवारी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता आवश्यक निर्णय घेऊन पावले टाकावीत, असेही त्यांनी सांगितले होते