मुंबई : पावसाळ्यात धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या मिठी नदीचा पूर रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. विहार आणि पवई तलाव भरल्यानंतर ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीत येते आणि पूरस्थिती निर्माण होते. ते रोखण्यासाठी दोन्ही तलावांच्या बंधाऱ्यांना डिस्चार्ज गेट बांधण्याच्या निर्णयावर स्थायी समितीमध्ये शिक्कामार्तब करण्यात आले आहे.
दोन्ही तलाव भरल्यावर अतिरिक्त पाणी बंधाºयावरून मिठी नदीत येते. सुमारे १८ किलोमीटर परिसरातील विविध नाले मिठी नदीला मिळतात. अशा परिस्थितीत समुद्राला भरती आणि मोठा पाऊस झाल्यास मिठी नदीची पातळी वाढण्याचा धोका असतो.गेल्या वर्षी २९ आॅगस्टला ‘मिठी’ने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे पवई व विहार तलावाचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी डिस्चार्ज गेट बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लवकरच या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.अशी सोडविणार मगरमिठीविहार आणि पवई तलावावर बांधलेली धरणे बंधारे पद्धतीची असल्याने धरण भरल्यानंतर पाणी वाहून जाते. ते अडवता येत नसल्याने डिस्चार्ज गेट बांधून पाणी धरणात अडविण्याचा विचार आहे. गेट बांधण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेच्या तज्ज्ञांसह पालिकेच्या पाणी खात्याच्या अधिकाºयांनी दोन्ही तलावांची पाहणी काही दिवसांपूर्वी केली होती.प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणारच्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती जलसंपदा विभागाकडून मिळवण्यात येत आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यावर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी मिठी नदीच्या पूरनियंत्रणासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने ही प्रक्रिया सुरू केली आहे.