Join us

खोदकामांवर शिस्तीचा बडगा

By admin | Published: May 24, 2015 1:02 AM

सततच्या खोदकामांमुळे रस्ते खराब होत असल्याने उपयोगिता सेवा कंपनीला शिस्तीचा बडगा दाखविण्याची तयारी पालिकेने केली आहे़

मुंबई : सततच्या खोदकामांमुळे रस्ते खराब होत असल्याने उपयोगिता सेवा कंपनीला शिस्तीचा बडगा दाखविण्याची तयारी पालिकेने केली आहे़ त्यानुसार नवीन रस्ते खोदणाऱ्या ठेकेदाराला चारपट दंड ठोठाविण्यात येणार आहे़ वर्षभरात नवीन केबल्स टाकण्याच्या प्रकल्पांची माहितीदेखील कंपन्यांकडून मागविण्यात येणार आहे़ जेणेकरून नवीन रस्त्यांना त्याचा फटका बसणार नाही़ गॅस, विद्युत पुरवठा, मोबाइल कंपन्या अशा ४० कंपन्यांंच्या भूमिगत केबल्स आहेत़ दरवर्षी सुमारे चारशे कि़मी़ रस्ते केबल्स टाकणे अथवा दुरुस्तीसाठी खोदले जातात़ मात्र रस्ता पूर्ववत करताना काळजी घेतली जात नसल्याने रस्ते असमतोल होतात़ कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते खड्ड्यात जाण्याचे हे एक प्रमुख कारण आहे़ जुन्या रस्त्यांखाली केबल्सवर नियंत्रण ठेवणे आता शक्य नसल्याने नवीन रस्त्यांची कामे होताना विशेष काळजी घेतली जाणार आहे़ यासाठी चर खोदण्यास परवानगी देण्याचे धोरणच पालिकेने तयार केले आहे़ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रस्ते खोदकामाचे निरीक्षण केले जाणार आहे़ पाच वर्षांपूर्वी स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने डॅक्ट पद्धतीने रस्त्यांची कामे करुन त्याखाली भूमिगत केबल्स टाकण्याची शिफारस केली होती़ डॅक्टद्वारे रस्त्याच्या कडेला एका छोट्या वाहिनीमध्येच सर्व केबल्स वाहिनी येतील़ ज्यामुळे संपूर्ण रस्ता खोदण्याऐवजी संबंधित कंपनी तो डॅक्ट खोदून आपले काम करू शकेल़ मात्र हा प्रकल्प फेल गेल्यामुळे आता नवीन धोरण आणण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)