Join us

पालिका अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव रोखण्याचा खुलासा करा; अमित साटम यांची महापौरांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 5:38 PM

आज त्यांनी केलेल्या कामांमुळे सत्ताधारी पक्ष बक्षीस, आणि मेडल तथा पुरस्कार मिळवत आहेत.

मुंबई-  मुंबई महापालिकेच्या स्थापत्य (शहर) समितीच्या बैठकीत विविध संवर्गातील १०५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याचा आणि विविध संवर्गातील २७ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदावर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव  मागील आठवड्यात मंजूर करण्यात आला. त्यानंतर सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी महापालिका सभागृहासमोर तातडीचे कामकाज म्हणून मांडण्यात आला होता. परंतु आजतागायत दोनवेळा महापालिका सभागृह बोलावून ते रद्द करण्यात आला. 

महापलिका सभागृह तातडीने बोलावून या अभियंत्यांना त्यांचा हक्क दिला जावा. त्यांना त्यांच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार सत्ताधारी पक्षाला नसून जर ते या अभियंत्यांना कोविड योध्दा समजत असतील तर ते येत्या तीन दिवसात हा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

सदर प्रस्ताव मंजूर न करण्यामागे कोणते कारण का अर्थकारण आहे, कोणाचे भांडण आहे, का कोणाचा वेस्टर्न इंटरेस्ट आहे. याचा खुलासा महापौरांनी करावा अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी केला आहे. अन्यथा सत्ताधारी पक्ष या अभियंत्यांना पदोन्नतीपासून डावलत आहेत हे स्पष्ट होईल. त्यामुळे अभियंत्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आणि यामुळे त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाला सत्ताधारी पक्ष जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला.

सदर प्रस्ताव मंजूर न होण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते मिळून अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या बढती तथा पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. कोविड काळात या सर्व अभियंत्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. कोविड सेंटरची उभारणी असो किंवा इतर कोविडच्या उपाययोजनांची अंमलबजावणी असो.. अभियंते रस्त्यांवर उतरून काम करत होते. प्रसंगी अनेक अभियंत्यांना जीव गमवावे लागले. शिरीष दीक्षित, अशोक खैरनार आदी अभियंते अधिकारी यांचे जीव गेले.

आज त्यांनी केलेल्या कामांमुळे सत्ताधारी पक्ष बक्षीस, आणि मेडल तथा पुरस्कार मिळवत आहेत. मुंबईत कोरोना नियंत्रणात आणलं असं जे काही चित्र निर्माण केलं जातं, ते याच अभियंत्यांनी कोविड सेंटरची उभारणी केल्यामुळे. त्यामुळे या अभियंत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा गौरव करण्याऐवजी त्यांना पदोन्नती तथा बढती पासून त्यांना रोखून एकप्रकारे त्यांना अपमानित व त्यांना दुर्लक्षित केले जात आहे अशी टिका आमदार अमित साटम यांनी केली.

टॅग्स :अमित साटमभाजपा