- मनीषा म्हात्रे, मुंबई
पश्चिम उपनगरातील वाकोला येथील आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांची हत्या केल्याची कबुली माजी नगरसेवक रझाक खानचा मुलगा अमजद याने पोलीस चौकशीदरम्यान दिल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले. मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेले वैमनस्य आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांमागे ससेमिरा लावण्यात आल्यामुळेच ही हत्या केल्याचे अमजदने चौकशीत सांगितले आहे. दरम्यान, हत्येसाठी वापरण्यात आलेले ७.६५ बोअरचे रिव्हॉल्वरही पोलिसांनी जप्त केले आहे. वीरा त्यांच्या कुटुंबासह अब्दुल रझाक खान चाळीत राहात होते. येथेच रझाक खानचे अनधिकृत गाळे आहेत. त्यातच २००७ साली वीरा याचा चंदू कम्पाऊंडमधील गाळाही खानने बळकावला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. त्यानंतर वीरा यांनी माहिती अधिकाराचा वापर करीत खानचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे वैमनस्य विकोप्याला गेले.गेल्या सहा महिन्यांत वीरा यांनी खानविरुद्ध पालिकेकडे तब्बल ४० तक्रारी केल्या. त्यानंतर पालिकेकडून त्याला १०० हून अधिक नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आर्थिक फटका बसून रझाकचा तणावही वाढला होता. त्यामुळे संतापलेल्या अमजद याने वीरांना संपविण्याचा कट आखला आणि शनिवारी वीरा घरात टीव्ही पाहत असताना गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रझाक हिंदुजा रुग्णालयात दाखल झाला. मात्र तो हत्येच्या दिवशीच रुग्णालयात दाखल झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच बळावून खान पिता -पुत्राच्या रुग्णालयातूनच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.दरम्यान, हत्येनंतर अमजदने घरात लपवून ठेवलेले रिव्हॉल्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती गुन्हे सहआयुक्त संजय सक्सेना यांनी दिली. तसेच हत्येच्या दिवशी घरातून हस्तगत केलेली बंदुकीची पुंगळीही आधीच तपासणीसाठी पाठविण्यात आली असून त्याचा या रिव्हॉल्वरशी संबंध तपासण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)