Join us

कल्याणच्या खुनाचा उलगडा ७२ तासांत

By admin | Published: March 08, 2017 2:22 AM

कल्याण रेल्वे स्थानकातील एका पुलाखाली ३0 वर्षीय इसमाचा दगडाने आघात करून खून केल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर कल्याण लोहमार्ग

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकातील एका पुलाखाली ३0 वर्षीय इसमाचा दगडाने आघात करून खून केल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर कल्याण लोहमार्ग पोलीस व गुन्हे शाखेकडून केलेल्या तपासानंतर ७२ तासांत खुनाचा उलगडा करण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या घडल्याचे तपासात समोर आले आणि यामध्ये पत्नीच्या प्रियकरालाच अटक करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी रात्री ९.५0च्या सुमारास संतोष पुजारी याचा मृतदेह कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ येथील नवीन पुलाच्या खाली आढळला. त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी सचिन म्हस्के (२८) याला अटक केली. कळवा येथे राहणारा संतोष पुजारी हा गुन्हेगार असून, सात गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये होता. जेलमध्ये असताना त्याची पत्नी ज्योती हिचे सचिनशी सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. संतोष पुजारी कारागृहातून २ मार्च रोजी बाहेर आला. त्या वेळी त्याच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीत ज्योती हिचे सचिनशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यावरून संतोष व सचिन यांच्यात वाद झाला. त्याचा राग मनात धरून सचिनने पुजारीला कल्याण रेल्वे स्थानकात पुलाखाली बोलावले आणि डोक्यात दगडाने आघात करून ठार मारले. त्यानंतर सचिन हा त्याच्या मूळ गावी जालना येथे पळून गेला. सचिनला ६ मार्च रोजी त्याच्या शेतातून ताब्यात घेतले. संतोष पुजारी याची पत्नी ज्योतीकडेही पोलिसांनी याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर पोलिसांना तपास करण्यात यश आले. लोहमार्ग पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त समाधान पवार, सहायक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पाबळे, पोलीस निरीक्षक माणिक साठे, पोलीस हवालदार शंकर परदेशी, नियाज हुल्ला, पोलीस नाईक विनायक लांडगे आदींनी तपास केला. (प्रतिनिधी)