Corona Vaccine: दुसरी लस घेतल्यानंतरचा त्रास व्यक्तिपरत्वे वेगळा; घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:23 AM2021-08-30T07:23:17+5:302021-08-30T07:24:18+5:30
घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचा सल्ला
मुंबई : कोरोनापासून बचावासाठी लस टोचून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण लसीकरणानंतर काहींना प्रचंड अंगदुखी, थंडी-ताप, डोकेदुखी असा त्रास होतो, तर काहींना फारसा त्रास जाणवत देखील नाही. लसीच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिपिंडे निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीरात सुरू असणाऱ्या लढ्याचे दृश्य स्वरूप थंडी-ताप, अंगदुखी, दंड दुखणे अशा लक्षणांच्या स्वरूपात दिसते. त्यात काही जणांना पहिल्या डोसनंतर, तर काहींना दुसऱ्या डोसनंतर त्रास होतो, मात्र याला घाबरून जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांना लसीकरणानंतर अधिक त्रास जाणवत असल्याचे दिसून येत आहे. ही लक्षणे दोन-तीन दिवसच टिकतात. परत फ्रेश वाटायला लागते. त्यामुळे लस घेतल्यानंतर घाबरण्याची गरज नाही, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.वेगवेगळ्या आजाराला प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते.
कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर कमीअधिक प्रमाणात शरीराचे तापमान वाढते. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हा प्रतिसाद अवलंबून असतो. लसीच्या बाबतीतही असेच आहे. त्यामुळे लस घेतल्यावर एखाद्याला अधिक किंवा कमी त्रास होतो. मात्र त्रास न झाल्यास शरीरासाठी लस परिणामकारक ठरलेली नाही, असे समजण्याचे कारण नाही, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिली आहे.
तरीही मास्क आवश्यकच
लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही असे नाही. परंतु, भविष्यात हा आजार झाल्यास गुंतागुंत कमी होते. त्यामुळे लस घेतलेली असली तरी संसर्ग श्रृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.