- अतुल कुलकर्णीमुंबई : भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला सतत डावलण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार असे नेते करीत असतानाच विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाचे कुठे चुकले, एवढ्या जागा कमी का झाल्या, याचे कसलेही चिंतन झालेले नाही. पराभवास जबाबदार असणाऱ्यांची नावे आम्ही दिली, पण त्याची कसली चौकशी नाही, की विचारपूस नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली.‘लोकमत’शी बोलताना खडसे म्हणाले की, नाराजांची मोट बांधण्याची गरज नाही, पक्षातील अस्वस्थ नेते आपोआप एकत्र येतील. येत्या १२ तारखेला पंकजा मुंडे पक्ष सोडतील असे मला तरी वाटत नाही, मात्र त्यांच्या मनातील खदखद त्या बोलून दाखवतील. तुमचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे का, असे विचारले असता खडसे म्हणाले की, माझा रोख माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा ज्यांच्यावर निवडणुकांची जबाबदारी दिली होती त्यांच्यावर आहे. कोणत्याही निवडणुकीत यश आले तर माझ्यामुळे आणि पराभव झाला तर दुसºयामुळे, ही भूमिका बरोबर नाही. ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीत नेतृत्व म्हणून जबाबदारी घेतली होती, त्यांना या पराभवाचा जाब विचारला पाहिजे. पक्ष कधीच वाईट नसतो, लोकसभेला आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पुण्याईमुळे मोठे यश मिळवले. काहींना आता ते यश स्वत:च्या कर्तबगारीमुळे आले, असे वाटत असेल तरी त्यांनी तसे समजण्याचे कारण नाही.पराभवाची कारणे शोधण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली का, असे विचारले असता खडसे म्हणाले, मला तर कोअर टीममधूनही काढून टाकले आहे. त्यामुळे पराभवाची कारणे शोधण्यासाठी बैठक झाली असेल तर ते मला माहिती नाही. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळे झाला आहे. ज्यांनी पक्षात राहून विरोधात काम केले अशांची नावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून दिली आहेत. त्याची तपासणी तरी करुन घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.याबद्दल प्रकाश शेंडगे म्हणाले, पंकजा मुंडे यांना पाडण्यात स्वकीयांचाच हात आहे. याआधी देखील गोपीनाथ मुंडे यांना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आणली होती. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, बहुजन समाजाच्या नेत्यांना, ओबीसी चळवळीतील नेत्यांना भाजपने कधीही स्थान दिले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीटे दिली गेली नाहीत. पंकजा मुंडे यांचा ज्यांनी गेम केला त्यांच्यावर त्यांनी अचूक नेम धरलेला आहे. तो कोणत्या दिशेने आहे हे येत्या १२ तारखेला कळेलच, असेही वडेट्टीवार म्हणाले.एकनाथ खडसे-पंकजा मुंडे भेटबुधवारी दिवसभरात एकनाथ खडसे यांची विनोद तावडे यांनी भेट घेतली. त्यानंतर खडसे स्वत: पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी गेले होते. दोघांमध्ये जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. आम्ही निवडणुकीनंतर भेटलो नव्हतो, त्यामुळे त्यांची भेट घेतली असे खडसे म्हणाले.
ओबीसी नेतृत्वास डावलत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता; नाराज एकत्र येण्याचा खडसेंना विश्वास
By अतुल कुलकर्णी | Published: December 05, 2019 4:35 AM