Join us  

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Published: June 19, 2014 1:54 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण व इतर कामे रखडली आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण व इतर कामे रखडली आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून गुरूवारी मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनास जाब विचारण्यात येणार आहे. बाजार समितीच्या मसाला व धान्य मार्केटमध्ये रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. भाजी मार्केटमध्ये प्रवेशद्वार व फळ मार्केटमध्ये विस्तारित मार्केटसह प्रवेशद्वारांचे काम सुरू आहे. सर्व कामे रखडल्यामुळे व्यापारी, माथाडी व वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. धान्य मार्केटमध्ये तर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सर्व ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे वर्षभरापासून वाहतुकीस अडथळा निर्माण होवू लागला आहे. मार्केटमध्ये वारंवार वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. बांधकामाचा कचराही मार्केटमध्येच टाकण्यात आलेला आहे. गटारांची अवस्थाही बिकट झाली आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. प्रसाधनगृह व इतर ठिकाणी असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू लागले आहे. धान्य मार्केटमधील चढ-उतार करणाऱ्या ओट्यांचीही दुरवस्था झाली आहे. याठिकाणी कामगारांनाही त्रास होवू लागला आहे. मार्केटमध्ये मूषक नियंत्रणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. उंदीर व घुशी धान्याची नासाडी करत आहेत. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मार्केटमधील सुरक्षा व्यवस्थेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार चोऱ्या होत आहेत. धान्य मार्केटच्या संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. यामुळेही मार्केटमध्ये चोरट्यांचा वावर वाढला आहे. संरक्षण भिंत बांधण्याचे कामही रखडले आहे. व्यापाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन काहीच कारवाई करत नसल्यामुळे ग्रोमा संघटनेने गुरूवारी सकाळी बाजार समितीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे मानद सचिव पोपटलाल भंडारी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)