‘ट्रक सुरू ठेवण्यासाठी इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:01 AM2020-04-29T02:01:52+5:302020-04-29T02:02:04+5:30
ट्रक सुरू ठेवण्यासाठी पैसे नाही, इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या, अशी मागणी वाहतूक संघटनेने केली आहे.
मुंबई : रस्ते वाहतूक क्षेत्राला दैनंदिन वाहतुकीसाठी पुरेसा निधी नाही तरीही अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत आहे. ट्रक सुरू ठेवण्यासाठी पैसे नाही, इंधन आणि टोलमध्ये सवलत द्या, अशी मागणी वाहतूक संघटनेने केली आहे. आॅल इंडिया मोटार वाहतूक काँग्रेसने म्हटले आहे की, रस्ते वाहतूक क्षेत्राला दैनंदिन वाहतुकीसाठी पुरेसा निधी नाही. टोल थांबविण्यात यावा तसेच डिझेलच्या दरात कपात करण्यात यावी. या दोन्ही गोष्टींमुळे वाहतुकीच्या ८० टक्के खर्चावर परिणाम होतो.
केंद्र सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत; पण लॉकडाउनच्या स्थितीनुसार राज्यांना निर्णय घेण्यास सांगितले. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांत कोरोनाच्या स्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत आॅल इंडिया मोटार वाहतूक काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरण सिंंग अटवाल म्हणाले, वाहतूकदारांना आयात शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. देशातील सर्व पोर्टवर कंटेनर्स जमा आहेत. अनेक वस्तू वाहनांमध्ये भरण्यात येतात ती वाहने अडकली आहेत. तर ट्रकचालकांनी स्थानिक प्रशासनाकडून छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत, असेही ते म्हणाले.