लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:05 AM2021-07-25T04:05:52+5:302021-07-25T04:05:52+5:30

मुंबई : मुंबई शहरातील कामगार, मध्यमवर्गीय नोकरदार, छोट्या व्यावसायिकांना मुंबईत रोजगारसाठी प्रवास करणे गरजेचे असते; परंतु कोरोनाकाळात मुंबई लोकलमध्ये ...

Discount local travel to citizens who have taken two doses of the vaccine | लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सूट द्या

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची सूट द्या

Next

मुंबई : मुंबई शहरातील कामगार, मध्यमवर्गीय नोकरदार, छोट्या व्यावसायिकांना मुंबईत रोजगारसाठी प्रवास करणे गरजेचे असते; परंतु कोरोनाकाळात मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याने त्यांना खाजगी वाहतूक, टॅक्सी व रिक्षाने प्रवास करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या हे खर्चिक असून, परिणामी नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, यासाठी भाजप उत्तर मुंबईतर्फे शनिवारी बोरिवली रेल्वेस्थानकावर आंदोलन करण्यात आले.

खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी, बोरिवलीचे आमदार सुनील राणे, उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. यावेळी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी यासंदर्भात एक निवेदन बोरिवली रेल्वेस्थानकाचे स्टेशनमास्तर राजेश गौर यांना भाजपच्या शिष्टमंडळाने सादर केले. मुंबईत ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांचे प्रमाणपत्र बघून लोकल रेल्वेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, याविषयी भाजप नेत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने याविषयी सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आता राज्य सरकारने यावर निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी आणि प्रवीण दरेकर यांनी केली.

या आंदोलनात भाजप युवा आघाडी महिला आघाडी, उत्तर मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Discount local travel to citizens who have taken two doses of the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.