Join us

विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत शुल्क भरण्याची सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:06 AM

एआयसीटीईकडून कोविडकाळात विद्यार्थी, प्राध्यापकांना दिलासा; प्राध्यापकांचे वेतन वेळेत करण्याच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिक ...

एआयसीटीईकडून कोविडकाळात विद्यार्थी, प्राध्यापकांना दिलासा; प्राध्यापकांचे वेतन वेळेत करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांनी, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तीन ते चार टप्प्यांत शुल्क भरण्यासाठी मुदत द्यावी; तसेच कोणताही नियम डावलून प्राध्यापकांना सेवेतून कमी करू नये, प्राध्यापकांना दर महिन्याला वेळेत वेतन द्यावे, अशा सूचना देशातील सर्व तंत्रशिक्षण संस्थांना एआयसीटीने (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) दिल्या आहेत.

अनेक तंत्रशिक्षण संस्थांकडून प्राध्यापकांचे वेतन वेळेवर न होणे, ते पूर्ण न देता अर्धेच देणे, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे एकरकमी शुल्कासाठी तगादा लावणे अशा तक्रारी एआयसीईटीकडे आल्या हाेत्या. याच पार्श्वभूमीवर एआयसीटीकडून हे निर्देश शिक्षण संस्थांना दिले. कोरोनाची देशातील स्थिती नियंत्रणात येईपर्यंत या सूचना कायम राहतील, असे प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी एआयसीटीईने काढलेल्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक राज्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांची सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना तीन ते चार टप्प्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी पालकांना मुदत द्यावी आणि या संदर्भातील सूचना शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित कराव्यात किंवा विद्यार्थ्यांना मेलद्वारे या संदर्भातील माहिती द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांचे वेतन पूर्ण आणि वेळेत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही शिक्षण संस्थांची असून, त्याबद्दल कोणतीही तक्रार चालणार नाही, असेही एआयसीटीईने सांगितले आहे. याशिवाय या काळात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी परिसरातील संस्थांनी वायफाय सेवेचा वापर विद्यार्थ्यांना करू देण्यास मुभा द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

* खोटी माहिती पसरणार नाही याची खबरदारी घ्या!

कोविड काळात शैक्षणिक संस्था, शैक्षणिक निर्णय आणि इतर बातम्यांच्या संदर्भात खूप चुकीची आणि खोटी माहिती समाजमाध्यमांवर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा बातम्यांना आवर घालणे, त्या विद्यार्थ्यांमध्ये पसरू न देणे; तसेच चुकीच्या, खोट्या माहितीबाबत वेळीच अधिकृत संस्थांना सूचित करणे ही जबाबदारी संबंधित शिक्षण संस्था आणि त्यांचे भागीदार यांची असेल, असे एआयसीटीईने स्पष्ट केले.

................................