...अन् लागला मांजऱ्या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:37 AM2019-09-30T06:37:20+5:302019-09-30T06:37:42+5:30
उभयचर प्राणी हे दुर्लक्षित घटक आहेत. यांच्यावर काम करणारी माणसे कमी आहेत. भारतात उभयचर आणि सरिसर्प यांच्या सुमारे एक हजार प्रजाती आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये दुर्लक्षित वन्यजिवांवर काम होणे गरजेचे आहे.
झाडांवर राहणा-या बेडकांची अंडी व बेडूक खाणाºया मांजºया सापाच्या नवीन प्रजातीचा शोध पश्चिम घाटात लागला. वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांच्या या भागातील कार्याची दखल घेत, त्यांचेच नाव मी या सापाला दिले आहे. त्यामुळे आता हा दुर्मीळ साप ‘ठाकरेंचा मांजºया साप’ या नावाने ओळखला जाणार आहे, असे वन्यजीव संशोधक वरद गिरी यांनी सांगितले.
- वरद गिरी
वन्यजीव संशोधक
प्रश्न : पश्चिम घाटातल्या नव्या मांज-या सापाच्या प्रजातीबद्दल काय सांगाल?
पश्चिम घाट हा कन्याकुमारी ते गुजरातपर्यंत व्यापला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला नॉर्दल पश्चिम घाट असेही म्हणतात. पण इथे जसे हवे तसे वन्यजीवावर संशोधनाचे काम झालेले नाही. केरळ आणि तामिळनाडूमध्ये वन्यजीवांवर संशोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गेली १५ ते २० वर्षे पश्चिम घाटात संशोधनाचे काम करतोय. एखादे काम हाती घेतल्यावर त्यातून अनेक नव्या गोष्टी अवगत होतात. यापूर्वी माणसांनी मांजºया साप पाहिला असेल. परंतु वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांना या सापात वेगळेपण जाणवले. तेजस यांनी यावर पाठपुरावा केला आणि ही एक वेगळी प्रजात असल्याचे सिद्ध केले.
प्रश्न : टेक्सोनॉमी सायन्स म्हणजे काय?
तेजस ठाकरे यांचे या संशोधनामध्ये मोठे योगदान आहे, त्यामुळे आम्ही ठरवले की या नव्या प्रजातीचे नामकरण हे ‘ठाकरेंचा मांजºया साप’ असे करावे, हे सर्वांच्या संमतीने झाले. एखाद्या प्रजातीचे बारसे करणे म्हणजे टेक्सोनॉमी सायन्स होय. अलीकडे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे जगात टेक्सोनॉमीची संख्या फारच कमी आहे. टेक्सोनॉमी करणारी माणसे ही अत्यंत दुर्मीळ प्रजात असे म्हणायला काही हरकत नाही. या माणसांना कुठलाही निधी मिळत नाही.
प्रश्न : नव्या प्रजातीच्या सापामध्ये वेगळेपण काय आहे?
नव्या प्रजातीच्या सापामध्ये वेगळेपण असे की, याच्या शरीरावरील खवले, खवल्यांची संख्या आणि रचना, रंग हे बघून सापाची नवी प्रजात आहे की नाही, हे ठरविले जाते. ठाकरेंच्या मांजºया सापासारखा दिसणारा एकमेव साप हा श्रीलंकेत सापडतो. परंतु या दोन्ही सापांच्या खवल्यांच्या रचनेमध्ये फरक आहे. तसेच त्यांच्या डीएनए अहवालानुसार हा वेगळ्या प्रजातीचा साप आहे, असे निदर्शनास आले. मांजºया प्रजातींच्या सापामध्ये हा एकमेव असा साप आहे की, तो झाडांवरील बेडकांची अंडी खातो. साधारण तीन फुटांपर्यंत सापाची लांबी असल्याची नोंद आहे.
प्रश्न : तुमच्या या संशोधनामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?
नव्या प्रजातीच्या सापाची नोंद करतेवेळी शास्त्रीयदृष्ट्या संशोधनाचा एक पेपर लिहून तो सादर केला जातो. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या २६ सप्टेंबरच्या जर्नलमध्ये (नियतकालिक) आम्ही तो प्रसिद्ध केला आहे. व्ही. दीपक, अशोक कॅप्टन, स्वप्निल पवार, डॉ. फ्रँक टीलॅक अशा तज्ज्ञांच्या टीममुळे हे संशोधन पूर्णत्वास नेणे शक्य झाले. नव्या प्रजातीच्या या संशोधनातील मुख्य लेखक मी स्वत: आहे.
(शब्दांकन : सागर नेवरेकर)