Join us

जम्पिंग स्पायडरच्या कुळातील नव्या प्रजातीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 5:22 AM

जम्पिंग स्पायडर (कोळी) प्रजातीच्या नव्या प्रजातीच्या दोन कोळ्यांचा शोध लागला आहे.

- सागर नेवरेकरमुंबई : जम्पिंग स्पायडर (कोळी) प्रजातीच्या नव्या प्रजातीच्या दोन कोळ्यांचा शोध लागला आहे. वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या कार्याची दखल घेत, यातील एका कोळ्याचे नामकरण ‘मॉरेंगो सचिन तेंडुलकर’ असे केले आहे, तर दुसरा कोळी हा ‘इंडो मॉरेंगो चावरापॅटर’ या नावाने ओळखला जाईल.गांधीनगरस्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी दोन जम्पिंग स्पायडर प्रजातीच्या कोळ्यांचा शोध लावण्यापूर्वी नऊ कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोचिपचा वापर करून जम्पिंग स्पायडरच्या दोन प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.वन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी या संदर्भात सांगितले की, ‘मॉरेंगो सचिन तेंडुलकर’ ही नवी प्रजात केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये आढळून येते, तसेच ‘इंडो मॉरेंगो चावरापॅटर’ हे नाव ‘संत चावरा’ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. संत चावरा यांनी केरळमध्ये शिक्षणाचा प्रसार केला होता. केरळ येथील पाथीरामनल आयलँड येथून ही प्रजात शोधली आहे. आतापर्यंत देशात ‘इंडो मॉरेंगो’ या प्रजातीची नोंद झाली नव्हती. दोन्ही प्रजातींची नोंद रशिया जनरल अथ्रोपोडा सेलेक्टा आणि गुजरात विद्यापीठात करण्यात आली आहे. वन्यजीव संशोधक जोबी मालमेल, ए. व्ही. सुधीकुमार, पी. ए. सिबेस्टीयन यांनी या प्रजातीची नोंद केली.याबाबत सचिन तेंडुलकर यांच्या इन्स्टाग्रामवर संदेश पाठविण्यात आला आहे. मात्र, अजून त्यांचे उत्तर आले नसल्याचे प्रजापती यांनी सांगितले.तेंडुलकर यांच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्काचा प्रयत्न‘मॉरेंगो सचिन तेंडुलकर’ हे नाव नव्या प्रजातीला देण्यात आले असून,क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांना संदेश पाठविण्यातआला आहे. मात्र, अजूनही सचिन तेंडुलकर यांच्याकडून उत्तर आलेले नाही, असे प्रजापती यांनी सांगितले.अशी आहेत वैशिष्ट्ये‘मॉरेंगो सचिन तेंडुलकर’ या कोळ्याच्या शरीरावर पट्टा आहे. त्यामुळे ही वेगळी प्रजात असल्याचे दिसून येते, तसेच ‘इंडो मॉरेंगो चावरापॅटर’ या कोळ्याचा रंग आणि आकारामध्ये वेगळेपण आहे. या दोन्ही प्रजातीचे कोळी झाडावर राहत असून, छोटे कीटक त्यांचे खाद्य आहे. याशिवाय त्यांना एकटे राहायला आवडते.

टॅग्स :मुंबई