मुंबई : सानुग्रह अनुदानाची रक्कम ठरविण्यासाठी महापौर दालनात बोलाविलेली गटनेत्यांची तिसरी बैठकही मंगळवारी फिस्कटली. विशेष म्हणजे आयुक्त अजय मेहता मंत्रालयात निघून गेल्याने महापौर व गटनेत्यांना त्यांची वाट पाहत तिष्ठत राहावे लागले. त्यामुळे पालिका कर्मचाºयांच्या बोनसचा तिढा अद्याप कायम असून यावर आता १२ आॅक्टोबरला निर्णय होणार आहे.पालिका कर्मचाºयांना गेल्या वर्षी १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र या वेळेस या रकमेत वाढ करून किमान ४० हजार रुपये मिळावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने केली आहे.मात्र जकात कर रद्द तसेच नोटाबंदीमुळे पैसे नसल्याने १४ हजारांहून अधिक बोनस देण्यास नकार दिला आहे. तर कामगारांना जास्त बोनस मिळवून देणारच, असे थेट आव्हानच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे. यावर सुवर्णमध्य गाठण्यासाठी महापौर दालनात मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती.मात्र आयुक्तांना मंत्रालयात जावे लागल्याने गटनेत्यांना त्यांची वाट पाहावी लागली. मात्र आयुक्त बैठकीला हजेरी लावू शकले नाहीत, त्यामुळे ही बैठक चर्चेविनाच गुंडाळावी लागली. भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११६ मध्ये बुधवारी पोटनिवडणूक असल्याने शिवसेना व भाजपाचे नेते तेथे तळ ठोकून आहेत.त्यामुळे बोनसवर आता १२ आॅक्टोबर रोजी पुन्हा चर्चा होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालिकेच्या बोनसची चर्चा लांबणीवर,आयुक्तांची गटनेत्यांच्या बैठकीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:37 AM