Join us

Plastic Ban : सोशल मीडियावरही ‘प्लॅस्टिकबंदी’चीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:23 AM

नोटाबंदीनंतर राज्यभरात प्लॅस्टिकबंदीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे याचेच प्रतिबिंब सोशल मीडियाच्या व्यासपीठावरही दिसते आहे.

मुंबई : नोटाबंदीनंतर राज्यभरात प्लॅस्टिकबंदीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे याचेच प्रतिबिंब सोशल मीडियाच्या व्यासपीठावरही दिसते आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरही याच विषयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. थेट प्लॅस्टिकच म्हणतेय...‘बघ माझी आठवण येते’ अशा खुमासदार पोस्ट्सचे जोरदार शेअरिंग होते आहे.सोशल मीडियावरच्या विनोदी पोस्ट्सना नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टमधील ‘आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या, आता गादीखालच्या पिशव्या...’ , ‘नवीन धमकी... तू नुस्ता गाडी पार्क कर... नाही तुझ्या हँडलला कॅरी बॅग अडकवली तर बघ’, ‘आमच्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांना कापडी कव्हर लावून मिळेल. स्थळ : अर्थातच पुणे’ या पोस्ट्सने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याशिवाय, प्लॅस्टिकच्या ग्लास आणि पिशवीच्या फोटोला श्रद्धांजली वाहणारा फोटोही नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे. बऱ्याच नेटिझन्सने हा फोटो स्टेटसवर शेअर केल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच, या विषयावरील ‘बघ माझी आठवण येते का?’ हे विडंबनात्मक काव्यही नेटिझन्समध्ये विनोदाची लाट पसरवत आहे.अनेकांनी सुचविले प्लॅस्टिकला पर्यायसोशल मीडियावरची प्लॅस्टिकबंदीची ही चर्चा टिष्ट्वटरवर बराच वेळ ट्रेंडिंगमध्येही होती. याशिवाय, ‘सोशल’ माध्यमातून प्लॅस्टिकला पर्यायही सुचविले जात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, काही व्यक्तींनी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या कशा बनवाव्यात याची माहिती या व्यासपीठावरून शेअर केली आहे. घरच्या घरी टाकाऊ वस्तू, कपड्यांपासून प्लॅस्टिकला कशा पद्धतीने पर्याय करु शकतो, याविषयीचे प्रात्यक्षिक देणारे व्हिडीओ आणि पोस्टही फेसबुकवर शेअर होत आहेत.‘दूध कागदात बांधून मिळेल का?’‘मला दूध घ्यायचे आहे, कागदात बांधून मिळेल का’, ‘आज कोणी ५००० रुपये दंड मागितला तर त्याला सांगा सरकारने दिलेल्या १५ लाखांमधून कापून घे...’, ‘नोटाबंदीप्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्याही बदलून मिळाव्यात’, ‘प्लॅस्टिक पिशवी हातात दिसली तर नागरिकांना ५ हजार दंड, पण रस्त्यात खड्डे दिसले तर पालिकेला व नगरसेवकांना किती दंड?’, ‘प्लॅस्टिकबंदीच्या नावाखालीसामान्य जनतेच्या खिशाला हात घालू नका, २०१९ जवळ येतेय हे लक्षातठेवा,’ अशा विविधांगी विनोदी शैलीत पोस्ट्सने सोशल मीडिया चांगलाच गाजतो आहे.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी