पूजा दामले,
मुंबई-४२ वर्षे केईएम रुग्णालयात वेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असलेल्या अरुणा शानबाग यांनी गेल्या वर्षी १८ मे रोजी या जगाचा निरोप घेतला. अजूनही अरुणाच्या आठवणींनी रोमांच उभे राहतात, अशी भावना त्यांच्या सहकारी असलेल्या नर्सनी व्यक्त केली. अरुणाच्या स्मृतिदिनानिमित्त पुन्हा इच्छामरणाच्या विषयाची चर्चा होत आहे. अरुणा हयात असताना त्यांना इच्छामरण मिळावे, अशी मागणी लेखिका पिंकी विराणी यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. पण, केईएम रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर यांनी त्याचा कडाडून विरोध केला. अरुणा यांचा गेल्या वर्षी न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. सध्या केंद्र सरकारने इच्छामरण या विषयावर लोकांची मते मागविली आहेत. त्यामुळे हा मुद्दा सध्या पुन्हा चर्चिला जात आहे. ‘लोकमत’नेही याविषयी तज्ज्ञांची मते जाणून घेतली.>माझ्या पेशानुसार, एखाद्याला इच्छामरण द्यायचे हे तत्त्वात बसत नाही. हा निर्णय सरसकट घेऊ नये. प्रत्येक व्यक्तीची केस ही वेगळी असणार आहे. त्यामुळे कोर्टाने निर्णय घेताना प्रत्येक केसचा अभ्यास केला पाहिजे. सर्वांनाच एकच एक नियम लागू होऊ शकत नाही. प्रत्येक पैलूचा अभ्यास करूनच हा निर्णय झाला पाहिजे.- अरुंधती वेल्हाळ, केईएम रुग्णालयाच्या मेट्रन>दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने इच्छामरणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, इच्छामरणाचा निर्णय सरसकट लागू केल्यास त्याचा दुरुपयोग होण्याचीही भीती आहे. त्यामुळे इच्छामरण हे नसावे. एखाद्या व्यक्तीला क्षणिक त्रास झाल्यास अथवा रागातूनही याचा वापर केला गेल्यास ते चुकीचे ठरेल. त्यामुळे इच्छामरणाच्या निर्णयासाठी एक वैद्यकीय पॅनल हवे. त्यांनी मिळून हा निर्णय घेतला पाहिजे. अरुणा शानबाग या त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे व्यक्त होऊ शकत नव्हत्या. काही व्यक्ती त्यांना होणाऱ्या हालांचे वर्णनदेखील करू शकत नाहीत. त्यांना होणारा त्रास गंभीर असतो, अशांना इच्छामरण दिले पाहिजे.- उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील >ज्या व्यक्ती विकलांग आहेत, ज्या व्यक्तींना आपण जिवंत आहोत याचीदेखील जाणीव नाही, अशा व्यक्तींसाठी इच्छामरण असावे. अजूनही इच्छामरण द्यायचा निर्णय कोणी घ्यायचा, कसा घ्यायचा, कसे करायचे याविषयी स्पष्टता नाही. अशा प्रकारे इच्छामरण द्यायला कोणते डॉक्टर तयार होतील हादेखील प्रश्नच आहे. हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतला पाहिजे. याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. हा अतिशय नाजूक विषय आहे, असेही डॉ. बर्वे यांनी स्पष्ट केले. - डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ