महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत शरद पवार-ठाकरे यांच्यात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:46 AM2021-06-30T06:46:13+5:302021-06-30T06:46:44+5:30
विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. थोपटे यांचे नाव आघाडीवर
अतुल कुलकर्णी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीच्या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिमाण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सहा जुलै रोजी निवडणूक होईल. त्यासाठीचे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल, अशी माहिती महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाच्या निर्बंधांबाबत व्यापारी वर्गामध्ये असलेली नाराजी, ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड या संदर्भातही त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमच्यात कसली नाराजी ?
आमच्यात कसली नाराजी आणि कसले काय? तुम्हीच बातम्या चालवता. तुम्हीच दोन्ही बाजूंनी बोलता, आम्ही फक्त मजा बघतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील नाराजीचे खंडन केले. अनेक गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या नसतात. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी सतत होत असतात. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या याआधी दीड वर्षात कधी भेटी झाल्या नाहीत का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. कालच मी आणि शरद पवार तीन तास एकत्र होतो. त्यावेळी माध्यमांवर सुरू असलेल्या बातम्या आम्ही पाहत होतो. तिघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे. तुम्हाला असे सांगते तरी कोण? हाच आम्हाला प्रश्न आहे. अनेकदा या बातम्यांनी आमची करमणूक होते, असेही अजित पवार म्हणाले.