विधान परिषदेसाठी बड्या नेत्यांची चर्चा; सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, वरुण सरदेसाई शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:45 AM2021-11-12T06:45:18+5:302021-11-12T06:45:24+5:30
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१४ ते २०१९ मध्ये वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : येत्या १० डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबई मतदारसंघाच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे, शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१४ ते २०१९ मध्ये वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आहेत. शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या नावाचादेखील विचार होऊ शकतो. मात्र, २०२४ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढवतील अशीदेखील चर्चा आहे.
विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे. मुंबईत कोविड नियंत्रणात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून मुंबई पालिकेत पक्षाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली होती. मातोश्री त्यांच्या कामावर खूश असून त्यांच्या नावाचादेखील आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. शिवसेनेत अनेक इच्छुक असले तरी शेवटी कोणाला तिकीट द्यायचे याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.