Join us

चर्चा मीडियात होत नसते

By admin | Published: January 22, 2017 2:47 AM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतचा प्रस्ताव दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडायला हवा. आघाडी करायची की नाही याची चर्चा

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतचा प्रस्ताव दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडायला हवा. आघाडी करायची की नाही याची चर्चा माध्यमातून होत नसते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुमप यांना फटकारले. काँग्रेसला स्वबळावरच लढायचे असेल तर आम्हीही तयार आहोत, असे सांगत अहिर यांनी राष्ट्रवादीच्या ३१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अहिर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यापूर्वी राष्ट्रवादीने पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आतापर्यंत राष्ट्रवादीने ७६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीने कमी जागांवर दावा केल्यास आघाडीचा विचार करू, असे विधान निरुपम यांनी शुक्रवारी केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना अहिर यांनी निरुपम यांना चांगलेच फटकारले. निरुपम यांच्यासह मुंबईतील नेत्यांना आघाडी नको आहे, असे खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार चव्हाण यांनी आघाडीसंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले होते. आमच्या दृष्टीने हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे निरुपम माध्यमात काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. आघाडीबाबत त्यांच्या भूमिकेत काही बदल झाला असल्यास तसा अधिकृत प्रस्ताव द्यावा. अन्यथा आम्ही स्वबळावर लढायची तयारी केलीच आहे, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या ३१ उमेदवारांची दुसरी यादी पुढीलप्रमाणे (कंसात प्रभाग क्रमांक) : तृप्ती मोरे (७), अजय विचारे (५८), संजय महाले (७३), श्रद्धा जाधव (७२), सुजाता आठवले (८३), सुनील राय (८८), मेहजबीन अकबर सय्यद (९४), युसुफ मुस्तफा सय्यद (९६), सोलंकी उमर दाऊद (९७), रूपाली सुभेदार (१०७), रुचिरा मोकल (११२), हेमलता पालवणकर (१२१), चंद्रमणी जाधव (१२७), आशा कणसे (१२८), रोशन हारुण खान (१२९), रोहित पांडव (१५१), नवनाथ काळेल (१५३), अफरोज शेख (१६०), रंगनाथन अय्यर (१७६), मोनिका सांतिमानो (१७७), आरिफ अब्दुल आलम सय्यद (१७९), साबिका मो. हसन कुरेशी (१८०), हिना शेख (१८३), संतोष शिंदे (१८४), शिरीनबानू पठाण (१८७), उमा भास्करन (२०२), नील शिवडीकर (२०६), सुरेखा पेडणेकर (२०७), सुनील पालवे (२१६), रूपेश खांडके (२२०), महेंद्र पानसरे (२२१). (प्रतिनिधी)उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आरोग्य विमा देऊराष्ट्रवादी सत्तेत आल्यास अवघ्या १०१ रुपयांच्या वार्षिक हफ्त्यात मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्याबाबतची योजना राष्ट्रवादीने आखली आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात या आश्वासनाचा समावेश करण्यात आला आहे. राजीव गांधी आरोग्य विमा योजनेत ज्यांचा समावेश होत नाही अशा नागरिकांसाठी ही योजना असणार आहे. उत्तर प्रदेशात प्रायोगिक तत्त्वावर अशी योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीने या योजनेचा अभ्यास केला असून ओरिएन्टल इन्श्यूरन्स आणि एलआयसी या दोन विमा कंपन्यांशी चर्चाही झाल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. विमा कंपन्यांशी अशा आरोग्य योजनेच्या व्यवहार्यतेबाबत चर्चा झाली आहे. केवळ १८०० कोटींमध्ये मुंबईकरांना आरोग्य सेवा देता येणे शक्य आहे. या योजनेत रुग्णालयात दाखल झाल्यापासून पूर्ण बरे होईपर्यंतचा रुग्णाचा सारा खर्च विमा कंपन्याच करतील. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे काम पूर्ण झाले असून २७ किंवा २८ जानेवारीस त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचेही या नेत्याने सांगितले.मालमत्ता कराबाबत शिवसेना-भाजपाची घोषणा फसवीपुन्हा सत्तेत आल्यास मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांवर मालमत्ता कर आकारला जाणार नाही, हे शिवसेनेने दिलेले आश्वासन आणि असा प्रस्ताव आपणच सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना दिला होता, हा भाजपाच्या मुंबई अध्यक्षांचा दावा मुंबईकरांची फसवणूक आहे. एक तर मालमत्ता कराचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो आणि तेथे शिवसेनेला कवडीची किंमत नाही. दुसरीकडे भाजपाला हा निर्णय घेण्यास आतापर्यंत कोणी रोखले होते? एरव्ही आंतरराष्ट्रीय बाजारात जरी तेलाचे भाव खाली आले, तरीही मुंबईत मोठमोठे कटआउट्स लावून त्याचे श्रेय मिळविणारे शेलार या प्रस्तावाचे श्रेय घेण्यात कमी कसे पडले, असा चिमटाही अहिर यांनी काढला.