कुत्ता गोली, कुत्ती गोली अन् फ्रेंचमध्ये उत्तराची तयारी; नशेच्या गोळ्यांवरून विधानसभेत रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:01 AM2024-07-11T10:01:12+5:302024-07-11T10:01:28+5:30

मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी मालेगावमधील नशेखोरीबाबत प्रश्न विचारला होता.

Discussion in the Legislative Assembly on the Kutta Goli used for intoxication | कुत्ता गोली, कुत्ती गोली अन् फ्रेंचमध्ये उत्तराची तयारी; नशेच्या गोळ्यांवरून विधानसभेत रंगली चर्चा

कुत्ता गोली, कुत्ती गोली अन् फ्रेंचमध्ये उत्तराची तयारी; नशेच्या गोळ्यांवरून विधानसभेत रंगली चर्चा

मुंबई : नशेसाठी वापरात येणाऱ्या ‘कुत्ता गोली, कुत्ती गोली’ या गोळ्यांवरून बुधवारी विधानसभेत चर्चा रंगली. विरोधकांच्या प्रश्नांना मराठी, तेलगू, गोंडी, माडी, इंग्रजी, हिंदी किंवा फ्रेंच भाषेतही उत्तर देण्याची आपली तयारी आहे, असे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
 
मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी मालेगावमधील नशेखोरीबाबत प्रश्न विचारला होता. त्याला आत्राम हिंदीतून उत्तर देत असताना, मराठीत बोला, असा आग्रह विरोधकांनी धरला. तेव्हा, हिंदीतून विचारले तर मी हिंदीत उत्तर देणार, माडी, गोंडी, इंग्रजी, तेलगूच काय; फ्रेंच भाषेतही उत्तर देण्याची  तयारी आहे, असे आत्राम म्हणाले. त्यावर, ‘आपली तयारी असली तरी फ्रेंचमधून उत्तर देण्याची मी अनुमती देऊ शकत नाही, सभागृहाने अधिकृत भाषा ठरविलेल्या आहेत, त्या भाषांतूनच उत्तर द्यावे लागेल,‘ असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. 

‘कुत्ता गोली’चा उल्लेख मोहम्मद इस्माइल यांनी केला होता. ज्येष्ठ सदस्य अनिल देशमुख यांनी ‘कुत्ता गोली’ असते तशीच ‘कुत्ती गोली’ही असते आणि ती  अधिक स्ट्राँग असते, अशी माहिती दिली. त्यावर, आत्राम म्हणाले की अल्प्राझोलम ही गोळी आहे, तिला ‘कुत्ता गोली’ म्हणतात, तसेच ‘कुत्ती गोली’ही असते का, याची मी माहिती घेईन. 

फाशीची तरतूद असलेला कायदा अडला

भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला कायदा राज्य विधिमंडळाने मंजूर केला होता. तो राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला; पण इतकी कठोर शिक्षा द्यायची का. असा आक्षेप राष्ट्रपतींकडून नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

मंत्र्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री धावले

दूधभेसळीवर बच्चू कडू यांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आत्राम यांच्या मदतीला धावले. रोज ६० लाख लिटर भेसळयुक्त दूध बाजारात येते, हा कडू यांचा दावा त्यांनी अमान्य केला; पण भेसळ होत असल्याचे त्यांनी मान्य केले. 

अन्न व औषधी प्रशासन विभाग बळकट करण्यासाठी सर्व प्रकारचे अर्थसाहाय्य दिले जाईल, कर्मचारीही पुरविले जातील असे ते म्हणाले. यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले. 
 

Web Title: Discussion in the Legislative Assembly on the Kutta Goli used for intoxication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.