अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू झालेली नाही. ती लवकरात लवकर होणे गरजेचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार भाजपसोबत किंवा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये दुरावा होईल, असे कोणतेही वर्तन राष्ट्रवादीकडून होणार नाही. मात्र जागावाटपाच्या चर्चेला फार विलंब करणे योग्य नाही. काँग्रेसला अजूनही त्यांचा जनाधार पहिल्यासारखाच आहे असे वाटते. मात्र वास्तव वेगळे आहे. वास्तवावर आधारित जागा वाटप झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कोणती जागा कोणाला दिल्यानंतर ती निवडून येईल, याचा विचार करून निवडून येण्याच्या क्षमतेवरच निर्णय घेतले तर ते महाविकास आघाडीला अधिक पोषक ठरतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्या बोलण्याचा स्वर अनेकांना खटकला. त्यावर काय त्यावर आपले मत काय?
- अजितदादांचा आवाज करडाच आहे. त्याचे फायदे किती, यापेक्षा तोटे जास्त आहेत. त्या दिवशीचा त्यांचा स्वर प्रसंगाला धरून नाही, असे वाटले असेल. मात्र त्यांना राजीनाम्याच्या निर्णयाची पूर्वकल्पना असल्यामुळे कदाचित ते तसे बोलले असतील. त्यांचे बोलणे प्रसंगाच्या विसंगत होते, असे वाटणे स्वाभाविक आहे; पण त्यांच्या मनात तसे कधीच नसते.
‘मविआ’त लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू नाही त्याचे काय?
- आम्ही विधानसभेला दरवेळी किमान १४४ जागा मागितल्या; पण त्या कधीच मिळाल्या नाहीत. याचा अर्थ आम्ही अडून बसलो असे नाही. जागावाटपाचा प्रश्न क्लिष्ट आहे. प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाचे सहयोगी तर काँग्रेस आणि आमचेही काही सहयोगी पक्ष आहेत; त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा तातडीने सुरू झाली पाहिजे. प्रत्येक पक्षाचे इगो असतात. मात्र चर्चेतून प्रश्न सुटतील. अजित पवार, सुप्रिया सुळे असे दोन गट आहेत ही चर्चा चुकीची आहे. काही लोक जाणीवपूर्वक ती पसरवत आहेत. एखाद्याचे एखाद्या नेत्यासोबत ट्युनिंग जुळते, याचा अर्थ तो त्या नेत्याचा नसताे. मी दिल्लीत सुप्रिया सुळेंसोबत काम करतो, तर राज्यात अजित पवार यांच्यासोबत, मग मी कोणाचा असा प्रतिसवालही केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अजित पवार यांनी भेट घेतली, तुम्हीदेखील त्यावेळी उपस्थित होता, अशी चर्चा आहे. त्याचे काय..?
- आजपर्यंत मी अमित शाह यांना फक्त दोनवेळा भेटलो. अमित शाह आणि अजित पवार यांची कधीही भेट झाली नाही. राजकारणात प्रत्येकाची वैचारिक भूमिका असते. मात्र भाजपसोबत जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. पक्षाचीदेखील ती भूमिका नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने लढलो तर यश आमचेच आहे. भाजप ज्या बारकाईने नियोजन करते, तसे नियोजन करण्याची आज आम्हाला गरज आहे.