मुंबई : हज यात्रेसाठी यंदा १ लाख २५ हजार यात्रेकरू जाणार आहेत. मात्र त्यांना भारतातून सौदी अरेबियात जाण्यासाठी सौदी अरेबिया व भारत सरकारमध्ये हवाई प्रवासाच्या तिकीट दरावरून मतभेद झाल्याने पुढील कार्यवाही खोळंबली. यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय हज समितीची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या वेळी सौदी अरेबियाने दिलेल्या दरांवर चर्चा केल्याची माहिती हज समितीचे अध्यक्ष खासदार मेहबूब अली कैसर यांनी दिली.बैठकीला हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या हवाई प्रवासाबाबत तिकीट दर एअर इंडियाने दिलेला आहे. हा दर सर्वांसाठी बंधनकारक असतो. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याचे सांगत सौदी अरेबियाने वेगळा दर दिला आहे. या दोन्ही दरांमध्ये मोठा फरक असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष शेख जीना, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सूद अहमद खान यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. दर वाढवता येत नसेल तर सर्व प्रवाशांना एअर इंडियाद्वारे प्रवास करण्याची व सौदीमध्ये पाठवण्याची मुभा सौदी अरेबियाने दिली आहे. मात्र सुमारे सव्वा लाख प्रवाशांना सौदीला पाठवण्याची एअर इंडियाची क्षमता नसल्याने समस्या निर्माण झाली आहे, असे सांगण्यात आले. हज समितीने केंद्राला केलेल्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती देण्यात आली.विमानाच्या दराचा वाद सुरू असल्याने विमानाचे वेळापत्रक ठरलेले नाही. त्यामुळे सौदीत जागा निश्चित करणे व इतर सुविधांची कार्यवाही खोळंबली आहे. प्रवाशांना जलमार्गाने पाठवण्याचा प्रयत्न असला तरी त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने विमान प्रवासावरच भिस्त आहे. हज समितीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला याबाबत शिफारस केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हज समितीच्या बैठकीत वाढलेल्या दरांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:13 AM