तक्रारीनंतरचे डांबरीकरण चर्चेत
By admin | Published: January 1, 2017 12:47 AM2017-01-01T00:47:15+5:302017-01-01T00:47:15+5:30
वडाळी येथील बांबू वनउद्यानात अंतर्गत दोन रस्ते निर्मितीत गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
बांबू वनउद्यानातील वास्तव : आरएफओ, कंत्राटदाराला ‘सॉफ्ट कॉर्नर’
अमरावती : वडाळी येथील बांबू वनउद्यानात अंतर्गत दोन रस्ते निर्मितीत गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. रस्ते निर्मितीत गिट्टीऐवजी मुरुम वापरून अपहार झाल्याच्या तक्रारीनंतर वनविभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर शुक्रवारी वनविभागाने उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार चालविला आहे.
वडाळी येथील बांबू वनउद्यान हे भविष्यात शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल. निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबीयांसह मौजमजा, आनंद लुटता येईल, असे सुंदर स्थळ वनविभागाने साकारले आहे. मात्र बांबू वनउद्यानात अंतर्गत दोन रस्ते निर्मितीत झालेल्या अपहाराने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. गतवर्षी मार्च २०१५ मध्ये रस्ते निर्मितीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदेतील अटी, शर्तीनुसार रस्त्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. परंतु रस्ते खडीकरणात ८० व ४० एमएम आकाराची गिट्टी न वापरता केवळ मुरुमाचा थर रचून रस्ता निर्माण करण्यात आला आहे. रस्त्याच्या वरील बाजूस डांबरीकरण केले. रस्ता ‘ओके’ झाल्याचा शेरा वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्याक डून मिळविला. त्यानंतर एमरॉल्ड कन्सलटन्सीने सुमारे १० लाखांचे बिल रस्ते निर्मितीच्या नावाने उचलले. खरे तर बांबू वनउद्यानात रस्ते निर्मिती व डांबरीकरणात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जात आहे की नाही, ही तपासण्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांची होती. मात्र दोन्ही रस्ते अवघ्या वर्षभरात उखडले. त्यामुळे साहित्याचा दर्जा लक्षात येतो. आरएफओ, कंत्राटदाराने मिलिभगत करून वनविभागाच्या डोळ्यात धूळफेक चालविली.
अगोदरच देयके अदा करण्यात आली आहेत. मात्र तक्रारीनंतर वनविभागाने रस्ते निर्मितीच्या चौकशीचा निर्णय घेतला आहे. हे प्रकरण वनविभागाचे अंगलट येत असल्याने वरिष्ठांकडून रस्त्याचे डांबरीकरण झाले? अशी शेलकी मिरवली जात आहे. याप्रकरणाची चौकशी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्यावर सोपविली असली तरी रस्ते निर्मितीत कोणताही अपहार झाला नाही, असा अहवाल सादर करून बांबू वनउद्यानाचे वास्तव गुंडाळण्याची तयारी वनविभागाने चालविली आहे. (प्रतिनिधी)