युवक काँग्रेसच्या ‘मैं भी नायक’ स्पर्धेत विविध प्रश्नांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 05:53 AM2019-09-16T05:53:31+5:302019-09-16T05:53:35+5:30
प्रदेश युवक काँग्रेसने राज्यातील विविध प्रश्नांवर आयोजित केलेल्या ‘मैं भी नायक’ या स्पर्धेची अंतिम महाफेरी रविवारी मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात पार पडली.
मुंबई : प्रदेश युवक काँग्रेसने राज्यातील विविध प्रश्नांवर आयोजित केलेल्या ‘मैं भी नायक’ या स्पर्धेची अंतिम महाफेरी रविवारी मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात पार पडली. विधिमंडळातील कामकाजाच्या धर्तीवर आयोजित या अभिरूप विधानसभेत स्पर्धकांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आपली बाजू मांडली. यावेळी अंतिम स्पर्धेतील २० विजेत्यांची नावेही घोषित करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या ‘वेक अप महाराष्ट्रा; उद्यासाठी आता’ या अभियानांतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या स्पर्धकाला राज्यातील अथवा त्याच्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
स्पर्धकांनी राज्यापुढील प्रश्न मांडतानाच विकासासाठी सूचना केल्या. रोजगार निर्मितीसाठी विकासाचा वेग वाढविला पाहिजे, शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा, अशी भूमिका मांडली. शेतीचा विकास दर घटल्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचे सांगतानाच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतमालाला रास्तभाव द्यावा, पायाभूत सुविधांचा विकास करावा, आणि बेरोजगारी
कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, अशा विविध सूचना
केल्या.
>वेळीच जागे व्हा - सत्यजीत तांबे
या अभियानाला राजकीय स्वरूप न देता, सर्व विचारधारेच्या युवकांनी सहभागी होऊन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सूचना कराव्यात. महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आजच जागे झालो नाही, तर काळ आपल्याला माफ करणार नाही, असे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी स्पर्धेबाबत बोलताना सांगितले.
विजेत्यांची नावे : प्रशांत राठोड, विजय अंजान, सौरभ शिगवण, गणेश गुप्ता, मनोज महाराणा, आशिष कांबळे, रोजपेला डिसुझा, शेहजाद मणियार, प्रगती सांगळे, रणजित जेडके, अजिंक्य बोराडे, ईश्वर तांबे, शुभम वकाडे, आकाश सारीख, पृथ्वीराज एकाले, वैभव दरेकर, शुभम हेंगाडे, अनुश्री हिरादेवे, मंजुश्री घोणे, स्वप्निल खरात आदी वीस युवकांना विजेते घोषित करण्यात आले.