जागावाटपाची चर्चा एका चहात संपेल - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:39 AM2018-10-26T05:39:12+5:302018-10-26T05:39:22+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही दोघांनी मिळून ४२ जागा तर जिंकलेल्या आहेतच.
मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही दोघांनी मिळून ४२ जागा तर जिंकलेल्या आहेतच. उरला प्रश्न ६ जागांच्या वाटपाचा. तो तर एका चहाच्या चर्चेत संपेल, असा विश्वास महसूलमंत्री व भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला.
मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, भाजपा-शिवसेनेने मिळून लोकसभेच्या ४२ जागा जिंकल्या होत्या. जागावाटपाचा प्रश्न मिटला की उर्वरित सहा जागा आम्ही आरामात खिशात घालू. विधानसभेलाही आमच्या दोघांच्या मिळून १८५ जागा आहेत. एकत्र आलो तर आणखी १५ ते २० जागा सहज खिशात घालू. गेल्या चार वर्षांत अशी एकही निवडणूक नाही जी भाजपाने जिंकली नाही. भाजपा व शिवसेना या सर्व निवडणुका वेगवेगळ्या लढूनही हे यश मिळाले आहे. निवडणुकांची आकडेवारी पाहता शिवसेनेनेदेखील अनेक निवडणुकांत यश मिळविले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मदत होईल असे सेनेने वागू नये. भाजपासोबत युती करूनच पुढील निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले. मुख्यमंत्री हा आमदारांच्या संख्येवर ठरत असतो. सेनेने आधी युती तर करावी, मग ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार मुख्यमंत्री निवडला जाईल, असेही ते म्हणाले.