Join us  

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची चर्चा; विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:10 AM

विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत सत्ताधारी भांबावले असल्याने त्यांनी ही अफवा पसरवली असल्याचा हल्लाबोल केला आहे.

Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून ५० हून अधिक आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत एक अतिरिक्त उमेदवार मैदानात असल्याने रंगत वाढली असून कोणत्या उमेदवाराच्या पदरी पराभव पडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच काँग्रेसची ८ ते ९ मते फुटणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत सत्ताधारी भांबावले असल्याने त्यांनी ही अफवा पसरवली असल्याचा हल्लाबोल केला आहे.

"आमची ९ मते फुटणार हा जावईशोध कोणी लावला? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ३१ जागा जिंकल्यामुळे वातावरण बदललं आहे. राज्यातील जनतेच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आमची मते फुटण्याचा प्रश्नच नाही. आम्हाला आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवावं लागलं नाही. महायुतीच्या आमदारांनाच डांबून ठेवण्यात आलं होतं. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचे नेते भांबावले आहेत," अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, "आम्ही काल बोलावलेल्या बैठकीला ३७ पैकी ३५ आमदार उपस्थित होते. या बैठकीला फक्त झिशान सिद्दिकी आणि जितेश अंतापूरकर हे आले नव्हते. मात्र तेही आमच्या संपर्कात असून आम्ही काँग्रेससोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आमची मतं फुटण्याचा प्रश्नच नाही," असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

काँग्रेस आमदारांबाबत काय चर्चा रंगत आहे?

काँग्रेसने बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर राहिल्याने या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि जितेश अंतापूरकर यांनी दांडी मारली. त्यामुळे या आमदारांकडून क्रॉस वोटिंग होणार असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसची केवळ दोन नव्हे तर एकूण आठ मते फुटणार असल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाच मते आणि भाजप उमेदवारांना तीन मते जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनीच विजयी होऊ शकतात. असं झाल्यास काँग्रेसची मोठी नाचक्की होणार असून महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार आहे. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारकाँग्रेसविधान परिषदविधान परिषद निवडणूक 2024