Join us

अजित पवारांना आणखी एक धक्का! 'हा' बडा नेता शरद पवार गटात घरवापसी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:11 AM

अजित पवार गटाला निलेश लंके यांच्यानंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनावणे हेही उमेदवारीसाठी इच्छूक होते. दरम्यान, आता अजित पवार गटाला निलेश लंके यांच्यानंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. आज बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे हे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. गेल्या काही दिवसापासून सोनावणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज दुपारी साडे चार वाजता बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. आज दुपारी चार वाजता स्वत: शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदार संघाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

माढ्यात मोठी राजकीय घडामोड होणार? 'शरद पवारांपासून दूर गेलेले परत येणार', जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनावणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. तर दुसरीकडे महायुतीमध्ये बीड लोकसभेची जागा भाजपला गेली आहे. यामुळे आता बजरंग सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. याबाबते राजीनामा पत्र त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केले आहे.

माढ्यात मोठी राजकीय घडामोडीची चर्चा

माढामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छूक आहेत. उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकापचे जयंत पाटील यांनी दिले आहेत. 

काल शेकापचे जयंत पाटील पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. जयंत पाटील म्हणाले, माढा मतदार संघात चांगलं वातावरण सुरू आहे. १८ ते ३० वर्षाचे तरुण शरद पवार यांच्या पाठिमागे आहेत.अकलूजला झालेली अवस्था म्हणजे बंडखोरी नाही, ते आमचेच लोक आहेत. माढ्यात आम्ही डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी मागणी केली आहे. माढ्यात काहीतरी बदल होईल, मी याबद्दल बोलत नाही, मी छोटा माणूस आहे. शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले नेते परत येतील, असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस