Join us

राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 1:45 PM

परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

मुंबई: परराज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कामगार आता त्यांच्या राज्यांमध्ये गेले आहेत. इथले उद्योगधंदे सुरू झाले की ते पुन्हा येतील. त्यामुळे परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरेंच्या या मागणीनंतर राज्य सरकार परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात संकट कोणतही मोठं संकट आलं की परप्रांतांमधून आलेले लोकं सर्वात आधी आपल्या राज्यात निघून जातील असं मी याआधी देखील सांगितलं होतं. कोरोनाच्या काळात देखील आता तेच घडताना दिसून येत आहे. त्यामुळे यातून बोध घेऊन परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

राज्यातले उद्योगधंदे सुरू झाले की परप्रांतीय पुन्हा येतील. त्यावेळी त्यांची चाचणी करुनच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात यावा. आपल्या राज्यातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे. मात्र तिथल्या परिस्थितीची कल्पना आपल्याला नाही. त्यामुळे येताना त्यांची तपासणी केली जावी, अशी सूचनी देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरेंची आणखी एक मागणी पूर्ण करत ठाकरे सरकार आगामी काळात ऐतिहासिक निर्णय घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीमनसेशिवसेना