Join us

...त्यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 5:59 PM

मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात 'सत्तासंघर्ष' सुरूच असल्याचे दिसते. आज भाजपा आणि शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपाकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात यासंदर्भात चर्चा होणार होती. मात्र, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपामध्ये 50-50 फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला होता. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात की, असे काही ठरलेच नव्हते. मग, लोकसभेवेळी असे काय ठरले होते, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

तसेच, भाजपाने ठरल्याप्रमाणे मागण्या मान्य कराव्यात. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने आजची बैठक रद्द करण्यात आली. आज चर्चा झाली नाही, उद्याच काही निश्चित नाही. जर मुख्यमंत्री काही ठरलेच नाही, म्हणत असतील तर चर्चा करण्याचा काय फायदा, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय, शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी संजय काकडे नक्की भाजपाचे आहे का? असा सवाल उपस्थित केला. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नव्हते. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधली धूसफूस आणखी वाढली आहे.  

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्रसंजय राऊत