coronavirus : स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र सरकारशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:44 AM2020-04-27T04:44:02+5:302020-04-27T04:44:15+5:30
याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू असून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली.
मुंबई : स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात सुरक्षितपणे पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू असून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मीडियातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मजूर आणि कामगारांना आपापल्या राज्यात पाठविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या राज्यात पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता नाही. रेल्वे सुरू झाल्यास गर्दी वाढण्याचा धोका आहे. तसे झाले तर पुन्हा लॉकडाउन वाढविण्याची वेळ येईल आणि हा धोका पत्करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
इतर राज्यांतील सुमारे साडेतीन लाख कामगार-मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. लॉकडाउनमुळे ट्रेन सुरू होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.
>राजस्थानात अडकलेले विद्यार्थी परत आणणार
राजस्थानच्या कोटा येथे राज्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्टÑातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत. दरम्यान, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिबच्या दर्शनासाठी आलेल्या शीख भाविकांचा एक गट रविवारी सकाळी पंजाबला परतला. हे सर्व भाविक मार्च महिन्यापासून नांदेडमध्ये होते.