गणेशमूर्तीच्या उंचीसाठी आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:42+5:302021-07-08T04:06:42+5:30
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींवर घातलेले बंधन शिथिल करण्यासोबतच गणेश मंडळांच्या आणि मूर्तिकारांच्या प्रमुख मागण्यांवर आठवडाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींवर घातलेले बंधन शिथिल करण्यासोबतच गणेश मंडळांच्या आणि मूर्तिकारांच्या प्रमुख मागण्यांवर आठवडाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिले.
राज्य सरकारने अलीकडेच घरगुती गणेशमूर्तींवर दोन फूट आणि सार्वजनिक मंडळासाठी चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे बंधन घातले होते. त्याशिवाय, वर्गणी गोळा करणे, जाहिरातींच्या बाबतीत नियमावलीत सूचना देण्यात आल्या होत्या. यावर गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकारांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती व मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीसोबत आज शिवसेना भवनमध्ये चर्चा केली. या बैठकीस मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, विनोद घोसाळकर आणि मुंबई शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मूर्तिकार उपस्थित होते.
या बैठकीत गणेशमूर्तींची उंची वाढवण्यासह इतर प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. गणेशमूर्तीची उंची वाढवण्याची एकमुखी मागणी सर्व मंडळांनी यावेळी केली. गणेशोत्सव आणि त्यानंतर वर्षभर राबविण्यात येणारे सर्व सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्यक्रम जाहिरातीतूनच भागवले जातात. कोविडकाळात स्वाभाविकच लोकवर्गणीवर मर्यादा आलेली असताना जाहिराती स्वीकारण्याचे स्वातंत्र्य मंडळांना मिळायला हवे. त्यावर निर्बंध आणता कामा नये, अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली.
मंत्री सुभाष देसाई यांनी मूर्तिकार व मंडळांच्या काही मागण्या प्रशासन स्तरावर तातडीने सोडवण्याची हमी दिली. तर, गणेशमूर्तीची उंची वाढवण्यासोबतच अन्य काही प्रमुख मुद्द्यांवर आठवड्याभरात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.