लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बाजार समितीमध्ये आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:07 AM2021-04-04T04:07:08+5:302021-04-04T04:07:08+5:30
नवी मुुंबई : राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाल्याचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ...
नवी मुुंबई : राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची चर्चा सुरू झाल्याचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांमधून ४ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. अचानक आवक वाढल्यामुळे काही प्रमाणात बाजारभाव कमी झाले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरामध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे लवकरच लॉकडाऊन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारपासून निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईत विक्रीसाठी पाठविला आहे. या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ५०० वाहनांची आवक होत होती. परंतु शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६९१ वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला.
सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर व इतर राज्यांमधूनही भाजीपाल्याची आवक झाली आहे. अचानक आवक वाढली; परंतु ग्राहक वाढला नसल्यामुळे काही भाज्यांच्या दरांमध्ये घसरण झाली. बीट, दुधी भोपळा, ढेमसे, फरसबी, फ्लॉवर, कोबी, शेवगा शेंग यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सोमवारपर्यंत शासन काय निर्णय घेणार यावर बाजारभाव अवलंबून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया
मुंबई बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. सोमवारपर्यंत शासन काय निर्णय घेणार व किती आवक होणार, यावर पुढील बाजारभाव अवलंबून राहतील.
शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट
होलसेल मार्केटमधील दोन दिवसांतील बाजारभाव पुढीलप्रमाणे
वस्तू २ मार्च ३ मार्च
बीट १४ ते १८ १२ ते १६
दुधी भोपळा १४ ते २० १२ ते १८
ढेमसे ४० ते ५० ३६ ते ४०
फरसबी ५० ते ६० २८ ते ३०
फ्लॉवर १६ ते २४ १४ ते १६
कोबी १० ते १४ ८ ते १२