शिक्षणमंत्री; सीबीएसई दहावीचे ७० हजार विद्यार्थी होणार उत्तीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई मंडळाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आगामी काळात सीबीएसई बोर्डाप्रमाणे किंवा त्या पॅटर्नप्रमाणे राज्य मंडळाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे तसे नियोजन करता येईल का, याची चर्चा आपण शिक्षणतज्ज्ञांशी करू आणि त्याप्रमाणे निर्णय जाहीर करू, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
सीबीएसई मंडळाकडून ४ मे ते १४ जून, २०२१ या कालावधीत नियोजित दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, मंडळाने स्वतः तयार केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येईल. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना या आधारावरील निकाल समाधानकारक वाटत नसतील, तर त्यांना जून महिन्यात पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल आणि अनुकूल परिस्थिती परीक्षा घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काेराेनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसईने स्वीकारलेल्या पद्धतीवर आपण तज्ज्ञांशी चर्चा करून ती पद्धती या विद्यार्थ्यांसाठी राबविता येईल का, हे पाहू असे स्पष्टीकरण दिले.
* सीबीएसईच्या परीक्षा ऑनलाइन का नाही?
अनेक पालक, विद्यार्थ्यांनी केंद्राच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले असले, तरी सीबीएसई मंडळाच्या परीक्षा ऑनलाइन का नाही घेतल्या गेल्या, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये अगदी विनाअनुदानितपासून जिल्हा परिषदेच्या अनुदानित, ग्रामीण भागातील शाळांचा समावेश होतो. त्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने, राज्य शिक्षण मंडळाला ऑनलाइन परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. मात्र, राज्यातील किंवा देशातील बहुतांश सीबीएसई शाळा जिल्हा भागात, शहर भागांत असून, सुसज्ज तंत्रज्ञान असलेल्या आहेत. अशा परिस्थितीत दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षाचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाइन परीक्षांची यंत्रणा का नाही, असे प्रश्न काही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.
* याेग्य निर्णय घेऊन ताे लवकर जाहीर करावा
राज्य शिक्षण मंडळाकडे अंतर्गत मूल्यमापनाची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. आता सीबीएसई मंडळाने निर्णय जाहीर केल्यानंतर, राज्य मंडळ यावर विचार करणार आहे. राज्य शासन आणि शिक्षण यंत्रणा उशिरा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी खेळ करीत आहे. योग्य निर्णय घेऊन ताे लवकरात लवकर जाहीर करावा.
अनुभा सहाय, अध्यक्षा, इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशन
..............................