Join us

बदलत्या वातावरणामुळे आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:36 AM

दिवसभर कडाक्याचे ऊन आणि रात्रीचा पाऊस अशा विचित्र वातावरणामुळे आजारांचा धोका वाढला आहे.

मुंबई : दिवसभर कडाक्याचे ऊन आणि रात्रीचा पाऊस अशा विचित्र वातावरणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. अशा वातावरणामुळे अनेकांना डोकेदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घशात खवखवणे अशा त्रासाला सुरुवात झाली आहे. व्हायरल आजारांचे प्रमाण वाढले आहे.गेल्या आठवड्यापासून तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस असे आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. शिवाय, मागील दोन दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानातील हा बदल आरोग्यासाठी धोकादायक असून यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाणही वाढल्याचे डॉक्टर सांगतात. पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतुलन निर्माण झाल्याने ताप, डोकेदुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वातविकार, हाडे दुखणे आदी आजार वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे उघड्या गटारातून वाहणारे पाणी, माश्या, मच्छर, दुर्गंधीमुळे जंतुसंसर्गाने होणाºया आजारांत वाढ होण्याची शक्यता आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे, असे डॉ. कौशिक गुजर म्हणाले.अद्यापही रस्त्यावर सरबते, ज्यूस, आईस्क्रीम, फळांचे काप आदी दुकाने थाटलेली आहेत. कधी कमी तर कधी जास्त होणाºया तापमानामध्ये नागरिक तहान भागविण्यासाठी सरबत, सोडा, शहाळे, बर्फावर ठेवलेले फळांचे काप आदींचे सेवन करतात. मध्येच अतिथंड आणि अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय पिल्याने शारीरिक संतुलन बिघडून आजाराला निमंत्रण मिळत आहे. बदलत्या वातावरणात शीतपेयांमुळे खोकला, सर्दी, ताप असे विकार वाढत आहेत. बाहेरचे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.>प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचेबाहेरचे अन्न किंवा शीतपेय आणि पदार्थ खाणे टाळावे, या दिवसांत माश्यांचा प्रादुर्भाव वाढतो. बदलत्या वातावरणात कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. भरपूर पाणी प्यावे. घरगुती अन्न खावे. आपली स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवा जेणेकरून साथीच्या आजारांना तोंड देता येईल, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.