Join us

जंतू संसर्गामुळे होणारे आजार टळणार; पालिकेची ४.५८ कोटींची विशेष तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:52 AM

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मागील काही वर्षांत अत्याधुनिक महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

मुंबई : पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मागील काही वर्षांत अत्याधुनिक महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अनेकदा ही यंत्रणा परदेशातूनही मागविलेली असते, त्यामुळे त्या वेळोवेळी स्वच्छ करणे आणि निर्जंतुकीकरण करणे यावर आता पालिकेने लक्ष द्यायचे ठरविले आहे. पालिका रुग्णालयांमधील रुग्णांची वर्दळ पाहता रुग्णालयांत रुग्णांना होणारा धोका टाळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ४.५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियागृह, एनआयसीयू, आयसीयू, आयसीसीयू, नेत्ररोग विभाग, अपघात विभाग, रेडिओलाॅजी, बाह्यरुग्ण विभाग, रुग्णकक्ष, प्रयोगशाळा, आदी विभाग कार्यरत आहे. तातडीच्या व आपत्कालीन प्रसंगी या विभागांना निर्जंतुकीकरण केलेल्या साहित्याची वारंवार आवश्यकता असते. या साहित्यांचे निर्जंतुकीकरण वेळेत होण्यासाठी, संक्रमण, दूषित जीवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्णकक्ष, बाह्यरुग्ण विभाग, इतर विशेष विभाग आणि शस्त्रक्रियागृह या विभागांना दररोज आवश्यकता भासणाऱ्या उपकरणे, साधनसामग्रीच्या निर्जंतुकीकरणाचा भार केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभागाकडे असणार आहे.

रुग्णालयांमधील संसर्गदर होणार कमी :

नियंत्रित वातावरणात पुरेशा व्यवस्थापकीय व तांत्रिक पर्यवेक्षणाखाली, कमीत कमी खर्चात जैविकदृष्ट्या सुरक्षित निर्जंतुकीकरण करून केंद्रीय विभागामार्फत अशा उपकरणांचे संकलन, स्वच्छता, जोडणी निर्जंतुकीकरण, साठा आणि वितरण करून रुग्णालयांमधील संसर्गदर कमी करणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे.

असे केले जाते निर्जंतुकीकरण :

रुग्णालयात निर्माण झालेला जैव कचरा निर्जंतुक करणे आणि दीर्घ काळ आणि सुरक्षित निर्जंतुकीकरण यासाठी नॅनो मटेरियलचा कल्पक वापर आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे वापर करण्यात येतो. निर्जंतुक यंत्रणेत बहुस्तरीय निर्जंतुकीकरण प्रक्रिया असून, त्यामध्ये ओझोन निर्मिती आणि युव्हीसी लाईट  स्पेक्ट्रमचा निर्जंतुकीकरण प्रभाव निर्माण केला जातो.

टॅग्स :मुंबईनगर पालिका