Join us

आजारांनी वसईकर जेरीला

By admin | Published: July 21, 2014 12:02 AM

गढूळ पाणीपुरवठ्यामुळे उपप्रदेशामध्ये डेंग्यू, मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेतर्फे विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे.

दीपक मोहिते, वसईगढूळ पाणीपुरवठ्यामुळे उपप्रदेशामध्ये डेंग्यू, मलेरिया व गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेतर्फे विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक खाजगी रूग्णालयात रूग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक संशयित रुग्ण असल्याचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.वसई-विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या ३ धरणातील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे सध्या परिसराला गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाण्यामुळे परिसरात आजारपणही वाढले आहे व डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका व ग्रामीण भागातील गावांना सूर्या, उसगाव व पेल्हार अशा तीन धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून उचलण्यात येणारे पाणी शुद्धीकरण केंद्रातून शहरी व ग्रामीण भागात पुरविले जाते, मात्र सतत जलवाहिनी फुटणे, गळती होणे अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे या जलवाहिन्यांत माती व अन्य घटक मिसळले जातात व परिसराला गढूळ पाणी पुरवठा होतो. दर पावसाळ्यात ३ धरणातील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे परिसराला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, मलेरिया व अन्य साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत, तर सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले. सर्वसाधारणपणे हे सर्व आजार अशुद्ध पाणी प्यायल्यामुळेच होत असतात. यासंदर्भात विविध आजाराचे किती रुग्ण आहेत. गॅस्ट्रो, मलेरिया व डेंग्यू या आजारांचे रुग्ण विविध इस्पितळात उपचार घेत असल्याचे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी सांगितले. मलेरिया - ३५, गॅस्ट्रो - ३० व डेंग्यू - ४५ संशयित रूग्ण विरार, कारगिलनगर व नालासोपारा आचोळे येथे आढळून आले आहेत. यावर आरोग्य विभागातर्फे विविध स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.