जेरबाई वाडिया मार्गाला खड्ड्यांचा आजार

By admin | Published: July 25, 2016 03:26 AM2016-07-25T03:26:59+5:302016-07-25T03:26:59+5:30

मुंबई महापालिकेच्या ‘रस्ते घोटाळ्या’त समावेश असलेल्या परळ येथील भोईवाडा परिसरातील जेरबाई वाडिया मार्गाला खड्ड्यांचा आजार झाला आहे

Diseases of the potholes on the Zarbai Wadia route | जेरबाई वाडिया मार्गाला खड्ड्यांचा आजार

जेरबाई वाडिया मार्गाला खड्ड्यांचा आजार

Next

चेतन ननावरे,  मुंबई
मुंबई महापालिकेच्या ‘रस्ते घोटाळ्या’त समावेश असलेल्या परळ येथील भोईवाडा परिसरातील जेरबाई वाडिया मार्गाला खड्ड्यांचा आजार झाला आहे. कारण या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास याच मार्गावर असलेल्या वाडिया, टाटा आणि केईएम रुग्णालयांतील रुग्णांना सहन करावा लागत आहे. शिवाय येथील खड्ड्यांची संख्या आणि आकार पाहिल्यास स्थानिकांनाही खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासामुळे याच रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे.
याबाबत स्थानिक नगरसेवक सुनील मोरे यांनी सांगितले की, जून महिन्यापर्यंत रस्त्याचे अर्धवट काम झालेले आहे. रुग्णालयाकडून येणारा मार्ग तयार झालेला आहे. मात्र जेरबाई वाडिया मार्ग पावसाळ्यानंतरच तयार होईल. यासंदर्भात पालिका सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित केले; तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. परिणामी, रस्ते विभागातील या निकृष्ट कामाचा दोष नागरिक नगरसेवकांना देत आहेत.
रस्त्याच्या डागडुजीचे काम करणारा कंत्राटदार जुझर याने सांगितले की, खड्डे बुजविण्यासाठी तसे वातावरण आणि जमीन कोरडी लागते. पावसाळ्यात खड्डे बुजविल्यास ते पुन्हा उखडतात. कारण खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पाण्यामुळे जास्त काळ तग धरू शकत नाही. त्यामुळे पावसाळा सुरू असेपर्यंत खड्डे पडतच राहणार; आणि ते पुन्हा पुन्हा बुजविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


येथे प्रेतांचेही हाल होतात...
भोईवाडा आणि नायगाव परिसरातील प्रकृती गंभीर असलेल्या किंवा अत्यवस्थ रुग्णांना टाटा रुग्णालयात नेताना जेरबाई वाडिया मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र या मार्गावरील खड्ड्यांमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही त्रास होतो. इतकेच नाही, तर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या प्रेतालाही खड्ड्यांच्या यातनांमधून सुटका मिळत नाही.
- प्रशांत गोन्सालवीस, रुग्णवाहिका चालक


खड्ड्यांचा त्रास नेहमीचाच
या ठिकाणचा रस्ता नेहमीच खराब असतो. परळ गावातून मुख्य रस्ता गाठण्यासाठी या रस्त्याचा वापर नेहमीच करावा लागतो. पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी पाणी जमा होते. त्या वेळी खड्ड्यांतून मार्ग काढणे खूपच कठीण होते. त्यामुळे अपघात होऊन एखादा जीव जात नाही, तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही, असेच वाटते.
- प्रसाद शिंदे, स्थानिक नागरिक


नगरसेवक म्हणतात...
गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी तीनवेळा खड्डे भरण्याचे काम करून घेतले. काम सुरू असताना स्वत: जातीने हजर होतो. मात्र कंत्राटदार हलक्या दर्जाचे साहित्य वापरत असल्याने काहीच दिवसांत खड्डे पुन्हा डोके वर काढत आहेत. तसे पाहिल्यास हा मार्ग चार नगरसेवकांच्या अखत्यारीत येतो. तरीही स्वत: रस्त्याची जबाबदारी घेऊन त्याच्या डागडुजीचे काम करत आहे.
- सुनील मोरे, स्थानिक नगरसेवक

रस्ते विभागाच्या प्रकल्पामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण रस्ता नव्याने बांधण्यात येईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ड्रेनेज (मलनि:सारण) लाइन नसल्याने पाणी मुरायला किंवा वाहून जाण्यासाठी जागा नाही. परिणामी, थोडा जरी पाऊस पडला, तरी या ठिकाणी पाणी भरते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. पाण्यातही टिकेल, असे खड्डे बुजविण्याचे साहित्य शोधत आहोत. तोपर्यंत या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश कंत्राटदारांना दिलेले आहेत.
- अनिल परमार, कार्यकारी अभियंता-एफ साऊथ

Web Title: Diseases of the potholes on the Zarbai Wadia route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.